नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्याला ‘भ्रष्टाचारा’चे भगदाड! पालिकेतील ‘ठेकेदारी राज’ पुन्हा चव्हाट्यावर; निकृष्ट कामाचे सर्वोत्तम उदाहरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर अभियानातून अवघ्या आठवड्याभरापूर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याला भलेमोठे भगदाड पडण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेत सुरु असलेल्या ठेकेदारी राजसोबतच कटकमिशनच्या नादात विकासाच्या नावाखाली सुरु असलेला भ्रष्टाचाराचा धुडगूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता नैसर्गिक तत्त्वाने अशा गोष्टी क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत मुख्याधिकारी तथा पालिकेच्या प्रशासकांकडे तक्रारी केल्या असून भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करीत या कामाचे ‘ऑडिट’ करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या राज्यस्तर योजनेतून शहरातंर्गत भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून 98 कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर करण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्यात भुयारी गटारांसाठी 65 कोटी रुपये तर, पाणीपुरवठ्याच्या लाईन टाकण्यासाठी 24 कोटी रुपये देण्यात आले होते. या योजनेतील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकवर्गणीचाही त्यात अंतर्भाव असल्याने त्यासाठी लागणार्‍या 5 कोटी लोकवर्गणीसाठी पालिकेने चालू आर्थिक वर्षापासून घरपट्टी, नळपट्टीसह अन्य सर्व करांमध्ये मोठी वाढही प्रस्तावित केली होती.


शासनाच्या राज्यस्तर योजनेतून मिळालेल्या 65 कोटींच्या भुयारी गटार बांधण्यासाठी आर.एन.कातोरे या ठेकेदाराची निविदा मंजूर करण्यात आली होती. शहराची भौगोलिकस्थिती आणि पूर्वीच्या गटारांची खोली तीन ते पाच मीटर खोल असल्याने संबंधित ठेकेदाराने त्यानुसार तितक्या खोलीचे खड्डे घेत त्यात पाईप टाकले व प्रचलित पद्धतीनुसार उकरण्यात आलेली माती टाकून पाण्यासह ते दाबण्यात आले. ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरु होती. त्यानंतर खोदलेल्या भागात जाडखडी व मुरुम टाकून पुन्हा पाण्याचा वापर करुन रोलरद्वारा खोदलेली जागा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला गेला. यासर्व प्रक्रियेत सहा महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आणि दरम्यानच्या कालावधीत भुयारी गटार, पाणीपुरवठ्याचे आणि नंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाईप टाकण्यात आले.


याच योजनेतून स्वातंत्र्यचौक ते बाप्ते झेरॉक्स ते शहर पोलीस ठाणे ते क्रीडा संकुल ते ईदगाह मैदानापर्यंतच्या भुयारी गटार, पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्पाच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. सहा महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या खोदकामांमुळे परिसरातील रहिवाशांसह या रस्त्यांचा वापर करणार्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याने पालिकेसह ठेकेदारावर काम लवकर पूर्ण करण्याचा दबाव वाढला होता. महिन्याभरापूर्वी स्वातंत्र्य चौक ते ईदगाह मैदान या संपूर्ण रस्त्यावरील गटार, पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्पाच्या पाईपचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाचा 47 लाख 61 हजार 264 रुपयांच्या निविदेद्वारा ठेका घेणार्‍या सोमनाथ पूंजा गोडसे यांनी खोदलेला खड्डा खचणार नाही याची दक्षता घेत टप्प्याटप्प्याने माती, जाड खडी, मुरुम व त्यावर पाण्याचा मारा करुन ते पूर्ववत करण्याचे काम केले.


जवळपास महिनाभर यासर्व गोष्टी केल्यानंतर गेल्याच आठवड्यात या रस्त्याचे डांबरीकरण उरकण्यात आले. त्यानंतरच्या दोन दिवसांनी शहरात जवळपास 65 मिलीमीटर पाऊस झाल्याने संपूर्ण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. याच पावसाने क्रीडा संकुलाकडून ईदगाह मैदानाकडे जाणारा रस्ता अभंग मळ्याजवळ खचला आणि रस्त्याच्या बरोबर मध्यभागी मोठे भगदाड पडले. त्यात वाहने आपटून अनेकांना गचकेही बसले आणि वाहनांच्या वजनाने सुरुवातीला उंदराच्या बिळाएवढा पडलेल्या खड्ड्याचे भगदाडातही रुपांतर झाले. याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या प्रशासकांकडे तक्रारी दाखल केल्या असून ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचाही आरोप केला आहे.


मात्र पालिकेच्या बांधकाम विभागाने सदरील आरोप फेटाळले असून तीन ते पाच मीटरपर्यंत रस्ता खेादल्यानंतर असा प्रकार घडणं क्रमप्राप्त असल्याचे म्हंटले आहे. सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून अद्यापही गटाराच्या चेंबरवरील ढापे मोकळे करण्यासह साईडपट्ट्यांची कामे शिल्लक असल्याचे व पालिकेकडून केवळ रस्त्याच्या कामाचे मोजमाप झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियमानुसार त्रयस्त व्यक्ति वा संस्थेकडून झालेल्या कामाचे परिक्षण झाल्यानंतरच ठेकेदाराला कामाचे पैसे अदा केले जातात. सदरील रस्त्याच्या कामाची त्रयस्तामार्फत तपासणी झालेली नसून ठेकेदाराला कोणतीही रक्कम अदा करण्यात आलेली नाही. खचलेल्या भागाची पाहणी केली असून संबंधित ठेकेदाराकडून ती दुरुस्त केली जाणार असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र रस्ता झाल्यानंतर अवघ्या दोन-चार दिवसांत रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

पालिकेकडून केल्या जाणार्‍या प्रत्येक कामाचे त्रयस्तामार्फत परिक्षण झाल्यानंतरच ठेकेदाराचे बिल देण्याची पद्धत आहे. स्वातंत्र्य चौक ते ईदगाह मैदनापर्यंतच्या रस्त्याचे असे कोणतेही परिक्षण अद्याप झालेले नाही. सदरील रस्त्याचे काम अद्यापही बाकी असून जमिनीखालील गटाराच्या चेंबरचे ढापे मोकळे करण्यासह रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे ओढणे बाकी आहे. भुयारी गटार अथवा पाईपलाईनचे खोलीवरील काम केल्यानंतर उकरलेली जमिन पूर्ववत करण्यासाठी वर्षभराचा कालावधी अपेक्षित असतो, मात्र हा रस्ता मोठ्या वर्दळीचा आणि नागरी वसाहतींनी गजबजलेला असल्याने अवघ्या सहा महिन्यांतच खड्डे बुजवून रस्ता करण्यात आला होता. तो क्रीडा संकुलाजवळ खचल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची पाहणी केली असून लवकरच त्याची दुरुस्ती केली जाईल. या कामाचे बिल अदा केलेले नसून नियमानुसार काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराला कोणतीही रक्कम दिली जाणार नाही.
पंकज मुंगसे
स्थापत्य अभियंता, संगमनेर नगरपरिषद

Visits: 26 Today: 1 Total: 79508

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *