म्युच्युअल गुंतवणूकदार संपत्ती निर्माण करतील ः कडलग घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहातर्फे स्नेहबंध मेळावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग 100 लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ती निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दीपावलीनिमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंग वाकळे उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदीप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटकाने अर्थ साक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ती निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात कडलग पुढे म्हणाले, दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्याने पैशांचे मूल्य कमी होत आहे. त्या तुलनेत संपत्ती निर्माण करण्यासाठी बचत व गुंतवणुकीतील फरक समजावून घेणे आवश्यक आहे. बँक मुदत ठेवीला त्यांनी धोकादायक सुरक्षित असे संबोधले. बँक मुदत ठेवी, पीपीएफ, रियल इस्टेट, सोने, शेअर्स, म्युच्युअल फंडस् आदी गुंतवणूक पर्यायांची तुलना व महत्व, त्यांच्या मर्यादा तसेच गुंतविलेल्या पैशांचा योग्य परतावा मिळण्यासाठी टाळावयाच्या चुका यासाठी कडलग यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. याप्रसंगी संदीप फटांगरे, सुभाष रहाणे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन सचिन फटांगरे यांनी करुन आभार मानले.
