निळवंडे धरणाच्या पाणलोटातील मुसळधारेने प्रवरा नदीला पुन्हा पूर! पंधरा हजाराहून अधिक क्यूसेकचा विसर्ग; संगमनेरच्या संगमावर 22 हजार क्यूसेक प्रवाह


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यांना झोडपून काढणार्‍या पावसाला भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटात फारसा जोर नव्हता. मात्र गेल्या 24 तासात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये थांबलेल्या पावसाने संगमनेर-अकोल्यासह पाणलोटातही थैमान घातल्याने आज सकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून पंधरा हजार 270 क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यातच आढळा धरणातून साडेतीन हजार तर भोजापूर धरणातून दोन हजारांहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने संगमनेरच्या संगमावर तब्बल 22 हजार क्यूसेक वेगाने पाणी वाहत आहे. एरव्ही दिवाळीच्या कालावधीत थंडी अनुभवणार्‍या नागरिकांना चक्क ऑक्टोबरच्या अखेरीस पाऊस आणि पुराचा सामना करावा लागत आहे.

राज्याच्या बहुतेक भागात अपेक्षेपेक्षा कितीतरी विलंबाने पोहोचलेल्या मान्सूनने नंतरच्या कालावधीत समाधानकारक हजेरी लावल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. उशिराने का होईना दमदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने मोठ्या अपेक्षेने पेरण्या केल्या होत्या. संगमनेर तालुक्यात सोयाबीन व बाजरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र ही पिके काढण्याच्या हंगामातच परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने हातात तोंडाशी आलेल्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आधीच पिचलेल्या बळीराजाचा पाय आणखी खोलात गेला आहे. ऐन दिवाळीच्या कालावधीत शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागल्याने त्याचा परिणाम बाजारपेठांवरही पडला असून दिवाळी अवघी दोन दिवसांवर येऊनही संगमनेरच्या बाजारपेठेत शेतकर्‍यांचे जेमतेम दर्शन होत आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोसळणारा परतीचा पाऊस जिल्ह्यातील मोठ्या धरणांचे पाणलोट वगळता उर्वरित सर्व भागात पडत आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा व प्रवरा या मोठ्या नद्यांच्या उपनद्या दुथडी भरुन वाहत्या असल्या तरीही या नद्यांमधील पाण्याचा विसर्ग मात्र तुरळक प्रमाणात सुरु होता. मात्र गेल्या 24 तासात भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटातही परतीच्या पावसाने थैमान घातल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यावाचून रोडावलेले प्रवरानदीचे पात्र आज पहाटे नंतर पुन्हा एकदा प्रचंड पाण्याने फुगले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या कालावधीत प्रवरानदीला मोठा पूर आला असून त्यात आढळा व भोजापूर धरणातून सोडलेले पाणीही मिसळत असल्याने संगमनेर नजीकच्या प्रवरा-म्हाळुंगी नदीच्या संगमावर जवळपास 22 हजारांहून अधिक क्यूसेक वेगाने पाणी वाहत आहे.

आज सकाळी सहा वाजता संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे – रतनवाडी 134 मि.मी., घाटघर 125 मि.मी., भंडारदरा 119 मि.मी., निळवंडे 109 मि.मी., वाकी 82 मि.मी., आढळा 35 मि.मी., अकोले 65 मि.मी., कोतुळ 50 मि.मी. व संगमनेर सतरा मि.मी. या 24 तासात मुळा धरणात 594 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून धरणातून आठ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. निळवंडे धरणात 227 दशलक्ष घनफूट, भंडारदरा धरणात 171 दशलक्ष घनफूट, आढळा धरणात 176 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून 3 हजार 512 क्यूसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. भोजापूर धरणात 86 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली तर धरणातून 2 हजार 130 क्यूसेक वेगाने पाणी वाहत आहे. सध्या उत्तरेतील सर्व धरणे तुडूंब भरलेली असल्याने धरणात दाखल होणारे संपूर्ण पाणी ओव्हरफ्लोच्या रुपात नदीपात्रात सोडून दिले जात आहे. त्यामुळे नद्यांना पुन्हा एकदा मोठा पूर आला आहे.

Visits: 241 Today: 1 Total: 1420890

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *