भंडारदर्‍याची धरती रानफुलांनी सजली निसर्गाचा नजारा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी


नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी असलेल्या अकोले तालुक्याला मूळातच निसर्ग सौंदर्याची खाण लाभलेली आहे. येथील भंडारदरा परिसरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे अद्भूत चमत्कार पर्यटकांना पाहावयास मिळत आहेत. आता देखील रानफुलांनी येथील धरती सजलेली असल्याने पर्यटक हा नजरा अनुभवण्यासाठी गर्दी करत आहे.

सप्टेंबरच्या शेवटच्या सप्ताहापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत पिवळ्या रंगाची सोनकी व खुरासनीची फुले घाटघर, रतनवाडी, भंडारदरा परिसरातील हिरव्यागार डोंगरदर्‍यात पसरलेली आहे. यामुळे निसर्ग सौंदर्यात आणखीच भर पडल्याने पर्यटकांना आकर्षित करत आहे. सध्या अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहे. यंदा सर्वत्र पावसाने जोरदार बरसात केल्याने हिरवळीने सह्याद्रीची पर्वतरांग नटून बसली आहे. या हिरवळरुपी शालीला आता रानफुले व गवत फुलांची झालर बसविली असून, अनेक प्रकारची निसर्गाची देणं असलेली रानफुले कळसूबाईच्या शिखरावर आणि रतनगडाच्या सभोवताली थाटात डोलत आहेत.

सोनकळीच्या फुलांनी संपूर्ण जंगलाला सोन्याचा मुलामा चढविल्यागत भास होताना दिसत आहे. भंडारदर्‍याच्या परिसरात अनेक प्रकारची गवत फुले व रानफुलेही उगवली असून निसर्गाचा हा अद्भूत देखावा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. रतनगडाच्या पायथ्याचा संपूर्ण परिसर रानफुलांनी बहरून गेला आहे, तर आशिया खंडातील सर्वात मोठी दरी समजल्या जाणार्‍या सांदन दरीचा आनंद घेण्यासाठी आलेले शेकडो पर्यटक या फुलांची मनमोहक अदा आपल्या कॅमेर्‍या टिपून घेत आहेत.

या रानफुलांमध्ये कारव्यासारख्या झाडाला सात वर्षांतून एकदाच फुल येत असून या कारव्याच्या झाडाचा उपयोग घरबांधणीसाठी व वाळल्यानंतर सरपणासाठी केला जातो. काही फुलांचा वापर आदिवासी बांधव आपले श्रद्धास्थान असलेल्या देवदेवतांना अर्पण करण्यासाठी करतात, तर काही फुलांचा वापर हा ठराविक आजारांवर औषधांसाठी केला जातो.

Visits: 119 Today: 1 Total: 1588621

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *