संतप्त नागरिकांसह शिवप्रतिष्ठान सोमवारी आंदोलन छेडणार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या साकूर परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबत सतत पाठपुरावा करुन देखील संबंधित प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. यामुळे परिसरातील संतप्त ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठानच्यावतीने सोमवारी (ता.27) सकाळी 10 वाजता रस्त्यांवरील खड्ड्यांत वृक्ष लागवड करुन आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन पोलीस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात शिवप्रतिष्ठानने म्हटले आहे की, प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संबंधित प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही. सद्यस्थितीत साकूर पठार भागातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शेतकर्यांना मालवाहतूक करण्यासाठी अनंत अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये मुख्यत्वे रणखांब फाटा ते दरेवाडी, साकूर ते नांदुर खंदरमाळ (जांबुत मार्गे), साकूर ते बिरेवाडी फाटा आणि मांडवे बुद्रुक ते वरवंडी रस्त्यांचा समावेश आहे. याची कोणतीही दखल घेतली नसल्याने परिसरातील संतप्त नागरिकांसह शिवप्रतिष्ठान रस्त्यांवरील खड्ड्यांत वृक्ष लागवड करुन आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी दिली आहे.