संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यांना अद्यापही निरीक्षक मिळेना! शहरातील दोघे कर्मचारी सुसाट; राजकीय वादात कोणीही अधिकारी यायला धजावेना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील संवेदनशीलतेच्या पंक्तीत असलेल्या संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यांना गेल्या दीड महिन्यांपासून अद्यापही कायम पोलीस निरीक्षकांची प्रतीक्षा आहे. एरव्ही संगमनेरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात वर्णी लागावी यासाठी पोलीस दलात मोठी स्पर्धा असते, मात्र येथील अधिकार्‍यांच्या बदलीआधीच राज्यात सत्तांतर झाल्याने सध्या संगमनेर विरुद्ध लोणी असा सुप्त संघर्षही सुरु झाला आहे. त्याचा परिणाम संगमनेरात कोणताही अधिकारी येण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. शहर पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांनीही अवघ्या महिन्याभरातच बदलीसाठी विनंती अर्ज दिल्याने वरील गोष्ट अधोरेखीत झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेत या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारीचा स्तर वाढत असताना त्याचा फायदा करुन घेत पूर्वीच्या अधिकार्‍याची वसुली करणारे शहर पोलीस ठाण्यातील ‘ते’ दोघे कर्मचारी अक्षरशः सुसाट सुटले आहेत.

संगमनेरचा पदभार घेतल्यापासूनच तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख वादग्रस्त ठरले होते. त्यांचा येथील कार्यकाळ नेहमीच वादात राहिला. या कालावधीत गेल्या वर्षी रमजानच्या महिन्यात पोलीस कर्मचार्‍यांवर जमावाचा हल्ला, भारतनगर परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी अहमदनगर पोलिसांचे छापे, त्यानंतर झालेले हिंदुत्त्ववादी संघटनांचे आंदोलन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शोभायात्रेत धर्मांधांचा धुडगूस अशा मोठ्या घटनांसह शहरातील सार्वजनिक शांततेसह कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. या कालावधीत घडलेल्या वरील सर्व घटनांना जबाबदार ठरवून वरीष्ठ अधिकार्‍यांनी पो. नि. देशमुख यांच्या बदल्यांचेही आदेश काढले, मात्र प्रत्येकवेळी त्यांनी राजकीय लोटांगण घालीत ते आदेश फिरवल्याने त्यांचा येथील कार्यकाळ अर्निबंध आणि शहराची घडी बिघडवणारा ठरला.

या कालावधीत शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांमधील अंतर्गत धुसफूसही उफाळून आल्याने शहर पोलीस ठाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली. पो. नि. देशमुख यांनी इतर कर्मचार्‍यांना राबवून घेताना आपली विशेष मर्जी केवळ दोघांवर कायम ठेवली. त्यामुळे या कालावधीत ‘त्या’ दोघा कर्मचार्‍यांचे फुगून फुगून अगदी बेडूक झाले. याबाबत शहरातील अनेकांनी वरीष्ठांकडे तक्रारीही केल्या, अगदी संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी कसूरी अहवालही पाठवला. मात्र राजकीय वरदहस्त लाभल्याने पो. नि. देशमुख यांच्या खुर्चीला मात्र कोणीही धक्का लावू शकले नाही. त्यामुळे त्यांचा येथील कार्यकाळ ‘वतनदारी’समान असल्याचाच अनुभव संगमनेरकरांनी अनुभवला. हा कालावधी शहर पोलीस ठाण्याच्या इतिहासात सर्वाधीक निष्क्रियतेचा ठरला. त्याचा परिणाम ना गुन्ह्यांचे तपास लागले, ना गुन्हेगारी घटना रोखण्यात अथवा त्या कमी करण्यात यश मिळाले.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सत्तांतर घडले आणि त्यानंतर या निष्क्रिय पोलीस निरीक्षकांच्या बदलीची आशा जागली. मात्र त्यासाठीही जवळपास महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागली आणि अखेर 24 ऑगस्ट रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह कार्यकाळ पूर्ण झालेले तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांची एकाचवेळी बदली झाली. त्यानंतर संगमनेर शहराची बिघडलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी कोणीतरी खमका अधिकारी मिळेल अशी आशा असताना संगमनेर विरुद्ध लोणी असा सुप्त संघर्ष तापू लागल्याने त्यात होरपळण्यापेक्षा जेथे आहोत, तेथे आनंदी आहोत या विचाराने पूर्वी स्पर्धेत असलेल्या जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांनी स्पर्धेतूनच माघार घेतली. त्यामुळे सुरुवातीला संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार तालुक्याच्या दुय्यम दर्जाच्या अधिकार्‍याकडे सोपविण्यात आला, तर तालुक्याचा पदभार घारगावकडे सुपूर्द केला गेला.

त्याच दरम्यान गणेशोत्सव तोंडावर येवून ठेपल्याने व त्यातच संगमनेर शहर संवेदनशील असल्याने शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न नको म्हणून पोलीस अधीक्षकांनी मुख्यालयातील पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सोपविला. त्यांनीही गेल्या महिन्याभरात पोलीस ठाण्याची बिघडलेली घडी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही संगमनेर-लोणी यांच्यातील सुप्त राजकारणाचे धक्के जाणवू लागल्याने गणेशोत्सव संपताच त्यांनी पुन्हा मुख्यालय गाठण्याचा मनसुबा रचला आणि काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांना बदलीसाठीचा विनंती अर्जही पाठवला.

Visits: 20 Today: 1 Total: 115511

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *