संगमनेरात अडिचशे कोटींचा ‘नदी सुधार प्रकल्प’ : आमदार तांबे ‘लाडकी बहिण’ योजनेवरही भाष्य; वाहतूक समस्येसाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपण फक्त नद्यांना आईच्या नावाने ओळखण्यात पटाईत असून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाच्या बाबतीत मात्र खूप मागे आहोत. प्रवरा-म्हाळुंगी-आढळा या नद्यांच्या संगमामुळे आपल्या शहराला ओळख प्राप्त झाली असून नद्यांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने आपण सुमारे 250 कोटी रुपये खर्चाचा ‘नदी सुधार प्रकल्प’ राबविणार आहोत. या प्रकल्पातंर्गत कपडे धुण्यासाठी स्वतंत्र घाटाची निर्मिती करण्यासह गणपती विसर्जन, सुरक्षित पोहणे, सार्वजनिक शौचालय, उद्यान, कारंजे आणि मनोरंजनाची साधनेही उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. खांडगावच्या पुलापासून फादरवाडीपर्यंतच्या परिसरात हा प्रकल्प राबवणार असून त्यासाठीचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे, लवकरच तो मंजुरीसाठी शासनाला सादर करणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या ‘पत्रकार कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.


या प्रकल्पावर अधिक प्रकाश टाकताना आपल्याकडील नद्यांची रुंदी एकसारखी नसल्याकडे त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. खांडगाव ते फारवाडीपर्यंतच्या भागातील प्रवरानदीची रुंदी एकसारखी करुन वरीलप्रमाणे सुविधा निर्माण करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी इटलीतील एका धरणाचे उदाहरण देताना ज्या नदीवर धरण बांधले तिच्यासाठी त्या धरणातून दररोज अर्धातास पाण्याचा विसर्ग सोडला जातो. यावरुन तेथील लोकांची नद्यांच्या बाबतीत असलेली भावना प्रकर्षाने जाणवते असेही त्यांनी सांगितले.


सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर अधिक भाष्य करताना आमदार तांबे यांनी घुलेवाडी, गुंजाळवाडी व सुकेवाडी या भागातून येणार्‍या नाल्यांचे पाणीही संगमनेर शहरातच येत असल्याने त्या नाल्यांचा समावेश या प्रकल्पात करणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नियमानुसार एकदा हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर शहरातील सर्व नाले कोरडे असणे आवश्यक आहे. मात्र सदरील नाले शहरीभागातील नसल्याने त्यांचा खर्च कोठून भागवायचा असा प्रश्‍न आहे. मात्र या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर तडीस जावे यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात असून यासर्व नाल्यांचा समावेश सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात करण्याचे नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेवरही आमदार सत्यजित तांबे यांनी भाष्य केले. या योजनेसाठी राज्य शासनाला 46 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार असून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी तो पेलणं फार अवघड नसल्याचे ते म्हणाले. मात्र या योजनेचा सरकारला कितपत राजकीय फायदा होईल हे निवडणुकीशिवाय सांगता येणं शक्य नाही. कोणतेही सरकार जेव्हा एखादी योजना राबवते, तेव्हा त्यामागे दोन महत्त्वाची कारणं असतात. एकतर ‘त्या’ व्यक्तिला अथवा समूहाला आर्थिक मदतं करणं ही भावना असतेच आणि दुसरं म्हणजे सरतेशेवटी हा सगळा पैसा बाजारात जाणार असल्याने त्यातून राज्याचे अर्थचक्र गतिमान करणं असा उद्देश असतो. त्यासाठी त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या वेतन आयोगाचे उदाहरणही दिले. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली ‘लाडकी बहिण’ योजना राबवणं सरकारसाठी अवघड नसल्याचे स्पष्ट मतंही त्यांनी व्यक्त केले.


कोणत्याही मोफत योजनांना आपला ठाम विरोध असल्याचे सांगताना आज विविध योजना, सरकारी कर्मचार्‍यांचे पगार व निवृत्ती वेतन यासाठी सरकारचे 56 टक्के पैसे खर्च होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशीच स्थिती देशातील सर्वच राज्यांची असून ‘कॅग’ने वेळोवेळी हा खर्च 40 ते 45 टक्क्यांच्या आंतच ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नसल्याने राज्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असून देशात साडेआठ लाख कोटी रुपयांच्या कर्जासह तामीळनाडू पहिल्या तर, आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जासह महाराष्ट्र दुसर्‍यास्थानी असल्याचे ते म्हणाले. सरकारने कधीही कर्जाला घाबरण्याचे कारण नाही, मात्र कर्जरुपाने घेतलेल्या पैशांचा वापरही योग्य कामांसाठी होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.


विकास हा केवळ भौतिक पट्टीने मोजता येत नसल्याचे सांगत त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात शहराच्या प्रगतीचाही आढावा घेतला. संगमनेर तालुका राज्यात पुढारलेला आहे. येथील समृद्ध बाजारपेठ, लोकांच्या राहण्यासाठी आवश्यक वातावरण, लोकांचे राहणीमान, उत्पन्नाची साधने, शिक्षण व आरोग्य व्यवस्थांची उपलब्धता या गोष्टी विकासात अंतर्भूत असतात. संगमनेर शहरात आपण त्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण केल्याचे आमदार तांबे म्हणाले. मात्र सध्या अडचण फक्त एकच असून रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहतुक व्यवस्था यावर आपल्याला अधिक काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

केवळ खड्डे युक्त रस्ते, वाहतुकीचा खोळंबा यासारख्या समस्या मांडून त्याचे समाधान होणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांनाच सामुदायिकपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सार्वजनिक पातळीवर एखादी विशेष मोहीम राबवणे आवश्यक आहे. अधिकारी येतील आणि जातील, मात्र आपल्याला कायमच या शहरात रहायचे असल्याने सर्वांनी सामूहिक प्रयत्नातून वाहतुकीचा जटील झालेला प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढे येण्याची नितांत गरज असल्याचे मतं आमदार तांबे यांनी संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या ‘पत्रकार कट्टा’ या कार्यक्रमातून मांडले. शेखर पानसरे यांनी आभार मानले.
(समाप्त)

Visits: 62 Today: 1 Total: 313151

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *