टपाल विभागाच्या अपघात संरक्षण विम्यास मोठा प्रतिसाद पठारभागातील सावरगाव घुले येथे विमा मेळाव्याचे आयोजन

नायक वृत्तसेवा, घारगाव
भारतीय टपाल विभागाने टाटा एआयजीसोबत करार करत अवघ्या 399 आणि 299 च्या वार्षिक हप्त्यामध्ये दहा लाखांचे अपघाती विमा कवच प्रदान केले आहे. सदर अपघात संरक्षण विम्यास ग्रामीण आणि शहरी भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुलेमध्ये खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि घारगाव डाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आधार, आधार मोबाईल लिंकिंग, सुकन्या समृद्धी योजना आणि अपघात संरक्षण विमा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, विपणन अधिकारी अमोल गवांदे, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील सावंत, देवस्थानचे अध्यक्ष सीताराम घुले, सचिव गोरक्षनाथ मदने आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खंडोबा देवस्थान ट्रस्टचा आदर्श प्रत्येक गावाने घेत अशाप्रकारच्या विमा मेळाव्याचे आयोजन प्रत्येक गावामध्ये केले पाहिजे असे प्रतिपादन फटांगरे यांनी केले.

टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी ही नवीन योजना आणली आहे. 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. यामध्ये प्रतिव्यक्ती फक्त 299 किंवा 399 रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये दहा लाख रुपयांचा विमा मिळवता येणार आहे. यामध्ये विमाधारकाचा मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. याशिवाय या विमा योजनेमध्ये अपघात झाल्यास रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि बाह्यरुग्ण खर्चास 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्चाचा दावा देखील करता येणार आहे. रुग्णालयात दाखल असल्यास दहा दिवस प्रतिदिन एक हजार रुपये देखील विमाधारकांना मिळणार आहे. कुटुंबाला रुग्णाच्या वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्चही दिला जाणार आहे. कोणत्याही कारणाने अपघात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी पाच हजार रुपये व विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयापर्यंतची रक्कमही दिली जाणार असल्याची माहिती मेळाव्यात अमोल गवांदे आणि स्वप्नील सावंत यांनी दिली.

या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन गोरक्षनाथ मदने आणि सीताराम घुले ग्रामस्थांना केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी घारगाव पोस्टमास्तर प्रवीण गुंजाळ, शाखा डाकपाल किशोर पोळ, सोपान घुले, सखाराम जाधव, जयश्री शिंदे, संजय आभाळे, संजय पोखरकर, नामदेव वालेकर, एकनाथ पाचकर, सूर्यभान जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

असा आहे पॉलिसीमधील फरक..
या दोन्ही योजना सारख्याच परंतु 399 च्या योजनेत विमाधारकाच्या मृत्यूनंतर दोन मुलांना एक लाखापर्यंतची मदत मिळू शकते. तसेच अपघातानंतर हॉस्पिटल बेनेफिट 90 हजार तर दवाखान्यात दाखल असल्यास 10 दिवसांपर्यंत प्रतिदिवस एक हजार रुपये मिळतात. वाहतूक खर्च 25 हजार व मृत्यूनंतर 5 हजार अंत्यसंस्कारासाठी मिळतात.
![]()
अतिशय कमी वार्षिक हप्त्यामध्ये टपाल विभागाने टाटा एआयजीच्या माध्यमातून दहा लाखाचे विमा संरक्षण देऊ केले आहे. श्रीरामपूर विभागामध्ये मेळाव्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेस यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
– हेमंत खडकेकर (डाक अधीक्षक, श्रीरामपूर विभाग)
