बोठे वस्ती परिसरातील वाड्या-वस्त्यांवर बिबट्याचा धुमाकूळ
नायक वृत्तसेवा, राहाता
शहरातील बोठे वस्ती परिसरातील वाड्या-वस्त्यांवर गेल्या महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक बकर्या व कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. दररोज बिबट्या दर्शन देत असल्याने येथील नागरिक रात्रंदिवस त्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे बिबट्याला तातडीने बंदिस्त करण्यासाठी वन विभागाने येथे पिंजरा लावावा, अशी मागणी सेवानिवृत्त कृषी अधिकारी मधुकर बोठे व शेतकर्यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याकडून माणसांवरील हल्ले वाढतच आहेत. तसेच काही बळी सुद्धा घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राहाता शहराच्या उपनगरातील वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी व नागरिक त्याच्या दहशतीने भयभीत झाले आहेत. बोठे वस्ती व लांडगे वस्तीसह परिसरातील वस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घालून शेतकर्यांच्या घरासमोरील शेळ्या व पाळीव कुत्री यांच्यावर हल्ले करून त्यांचा फडशा पाडला आहे. सायंकाळी साडेसहा-सात वाजताच बिबट्याचे दर्शन होते. मादी बिबट्या व तिचे बरोबर दोन पिल्ले असल्याचे बोलले जात आहे. या परिसरात पेरू, चिकूच्या बागा व ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्या दिवसभर शेतात आराम करतो व संध्याकाळ होताच सात साडेसात वाजेच्या दरम्यान शिकारीच्या शोधात फिरतीवर बाहेर पडत असतो. तर परिसरातील नागरिकांना बिबट्या सातत्याने दर्शन देत आहे. बिबट्याच्या दहशतीने शेतातील मेहनती मशागतीचे कामे करणे व उभ्या पिकांना पाणी भरणेही कठीण झाले आहे. पेरूची फळे तोडण्यास अथवा शेतीची इतर कामे करण्यास शेतमजूर अथवा एकटा दुकटा माणूस धजावत नाही. गावातील डेअरीवर दूध घालणे अथवा इतर कामे दिवस मावळायच्या आतच करावी लागत आहे. रात्री-अपरात्री घराबाहेर निघणे म्हणजे अनेकांना धडकी भरत आहे. माणसांबरोबरच वस्तीवरील गुरेढोर व इतर पाळीव प्राण्यांनी सुद्धा रात्रीची बिबट्याची धास्ती घेतलेली दिसते. अनेकांना जनावरांचा जीव वाचवण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे वन विभागाने या परिसरातील शेतकरी बांधव व नागरिकांना बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावून मादी बिबट्या व तिच्या पिलांना जेरबंद करावे अशी मागणी सेवानिवृत्त कृषी अधिकारी व शेतकरी मधुकर बोठे, चंद्रकांत इनामके, किशोर गिरमे, सुबोध बोठे, स्वप्नील बोठे, पप्पू बोठे, रामदास लांडगे, संकेत लांडगे यांनी केली आहे.