श्रीकांत कासट यांच्यासारखा कडवट मराठा बघितला नाही! डॉ.शिवरत्न शेटे; श्रीकांत कासट यांच्या ‘दुर्गवैभव’चे प्रकाशन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी हजार-पाचशे कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणारे शेकडो ‘कासट’ असतील. पण, त्या सगळ्यात श्रीमंत असलेले एकमेव कासट म्हणजे श्रीकांत कासट आहेत. पैसा येतो आणि जातो, कोट्यधीश असलेले किती कासट महाराष्ट्र लक्षात ठेवील हे माहिती नाही, पण पिढ्यान्पिढ्या श्रीकांत कासट यांचे पुस्तक महाराष्ट्राचे दुर्गवैभव वाढवत राहील, हिच खरी शाश्वत श्रीमंती असल्याचे प्रतिपादन हिंदवी परिवाराचे संस्थापक, शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी केले.

दुर्गमित्र श्रीकांत कासट यांनी गेल्या चार दशकांत महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर भटकंती करताना तेथील इतिहास, त्याची माहिती व छायाचित्रांचे संकलन केले आहे. त्यांच्या या परिश्रमांना धुळ्यातील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे प्रकाशनाने पुस्तकाचे रुप देताना ‘दुर्गवैभव महाराष्ट्राचे’ हा सचित्र माहितीग्रंथ साकारला आहे. गीता परिवाराच्यावतीने संगमनेरात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला, याप्रसंगी डॉ. शेटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, पानिपतकार, साहित्यिक विश्वास पाटील, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, केंद्रीय आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे, लेखक श्रीकांत कासट व राजवाडे संशोधन केंद्राचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शेटे म्हणाले की, कोणत्या जातीत, मातीत, राज्यात, देशात अथवा खंडात जन्माला यायचे हे आपल्या हाती नसते. पण, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येणार्‍या प्रत्येकाला शिवचरित्राशी जोडणारे असंख्य श्रीकांत कासट या मातीत जन्माला आले आहेत. पाठीचा भयंकर आजार, हृदयावर झालेली शस्त्रक्रिया आणि डोळ्यांचा विकार असतानाही त्या वेदना सहन करुन वयाच्या पासष्टीत सह्याद्रीच्या काताळात धावणार्‍या श्रीकांत कासट यांच्यासारखा कडवट मराठा आपण आजवर बघितला नसल्याचेही डॉ. शेटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

विश्वास पाटील यांनी संगमनेर परिसराला शहाजीराजे व जिजाऊ साहेबांचा प्रदीर्घ सहवास लाभल्याचा दाखला दिला. येथील पेमगिरीच्या किल्ल्यावरच शहाजीराजांनी छोट्या मुर्तजा निजामाला मांडीवर बसवून स्वतंत्र राज्याची स्थापना करीत दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिले होते. ज्या संगमनेरच्या भूमीत पहिल्यांदा स्वराज्याचे स्वप्नं पाहिले गेले, त्या भूमीतल्या तरुणाला गडकोटांनी भुरळ घालावी आणि त्यातून त्याने स्वराज्यातील सगळ्या किल्ल्यांवर वारंवार भटकंती करावी यात काही तरी दैवी योजना दिसल्याचे ते म्हणाले. संपूर्ण आयुष्य गडवाटा तुडवणार्‍या श्रीकांत कासट यांच्यासारख्या शिवप्रेमीच्या प्रत्यक्ष अनुभवातून साकारलेले दुर्गवैभव हे पुस्तक महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा जिवंत केल्याशिवाय राहणार नाही असेही पाटील यांनी सांगितले.

डॉ. संजय मालपाणी यांनी प्रास्तविकात श्रीकांत कासट यांच्या अपरिचित असलेल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. गीता परिवाराच्या माध्यमातून बालगोपाळांना गडकोटांचा लळा लागावा, छत्रपती शिवरायांचा पराक्रम त्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी राबविल्या गेलेल्या गिरीभ्रमण मोहिमेबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. दुर्गवैभव पुस्तकातील माहिती त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा परिपाक असल्याने त्याचा आधार घेवून निर्धोकपणे गडवाटा तुडविता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनीष मालपाणी व डॉ. ओमप्रकाश शेटे यांनीही पुस्तकाचे महत्त्व विशद् करतांनाकासट यांच्या समर्पित भावनेचे कौतुक केले.

पुस्तकाचे लेखक श्रीकांत कासट यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संगमनेरातील व्याख्यानमालेतून आपण प्रभावित झाल्याचे सांगितले. शिवशाहीरांशी थेट संपर्क आल्यानंतर त्याकाळातही वेगवेगळ्या गडकोटांची सविस्तर माहिती, त्याचा इतिहास, जाण्याचे रस्ते, वाहने व तेथील उपलब्ध सोयी बाबतही त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्याचे ते म्हणाले. गेल्या चार-साडेचार दशकांत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज गिर्यारोहक, इतिहासकार, छायाचित्रकार, इतिहास अभ्यासक आणि मराठा साम्राज्यासाठी रक्त सांडणार्‍या पराक्रमी घराण्यांमधील आजच्या पिढीतील व्यक्तिंच्या भेटी झाल्या. ऐतिहासिक दस्त, शस्त्रे हाताळता आली. का संपूर्ण काळ भारावलेला होता, ज्यातून आपण कधीही बाहेर पडू इच्छित नसल्याचे भावोद्गारही त्यांनी यावेळी बोलताना काढले. प्रज्ञा म्हाळस व संजय करपे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Visits: 29 Today: 1 Total: 114709

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *