कार्यकाळ संपण्यापूर्वीच सरपंचपदाचा राजीनामा द्यावा ः खंडागळे टाकळीभान येथील पदाधिकार्‍यांमध्ये रंगला कलगीतुरा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान येथील सरपंचांचा महाविकास आघाडीतील ठरावाप्रमाणे 20 महिन्यांचा कार्यकाळ संपत आल्याने कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा द्यावा. त्यासोबतच आपण उपसरपंचपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी ग्रामसचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

एकहाती सत्ता मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या सत्ताधार्‍यांमध्ये वर्षभरापासून संघर्ष पेटलेला असल्याने विकास खुंटल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सरपंच व उपसरपंच असे दोन गट झाल्याने विकासाऐवजी कुरघोड्यांचा खेळ रंगल्याने ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासनाला दोषी धरले जात असल्याने उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सोशल मीडियावर पदाच्या राजीनाम्यावर भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचा संदेश टाकत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पत्रकार परिषदेकडे लागल्या होत्या.

या पत्रकार परिषदेत खंडागळे म्हणाले की, दीड वर्षापूर्वी महाविकास आघाडीची स्थापना करुन आम्ही निवडणूक लढवली. महाविकास आघाडीचे 16 सदस्य निवडून आले होते. सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने व महाविकास आघाडीत सरपंच पदासाठी तीन महिला पात्र होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकित तीनही महिलांना सरपंचपदाची संधी देण्यासाठी 20-20 महिन्यांचा कार्यकाळ देण्याचा ठराव करण्यात आला व प्रत्येक वर्षी उपसरपंच निवड करण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रथम सरपंच म्हणून अर्चना यशवंत रणनवरे व उपसरपंचपदी आपली निवड करण्यात आली. आगामी 20 ते 25 वर्षे आरक्षण चक्रानुसार अनुसूचित जाती महिलेला सरपंचपदाची संधी मिळणार नसल्याने उर्वरीत दोन महिलांना संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.

दोन महिन्यात सरपंचांचा कार्यकाळ संपत असून उर्वरीत दोन महिलांना सरपंचपदाची संधी देण्यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा. सरपंचांच्या राजीनाम्यासोबतच आपणही उपसरपंचपदाचा राजीनामा देऊन अन्य सदस्याला संधी देऊ. मी आजच माझे राजीनामा पत्र माजी सरपंच मंजाबापू थोरात व जयकर मगर यांच्याकडे देत आहे. सरपंच व उपसरपंच यांचे राजीनामे एकाच बैठकित मंजूर करून मतदार व सदस्यांना दिलेला शब्द महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाळावा, अशी भूमिका खंडागळे यांनी मांडली. कुरघोडीच्या राजकारणात विकास खुंटला असल्याचीही कबुली त्यांनी देऊन ग्रामपंचायतीच्या सत्तेत आहे तोपर्यंत कोणत्याही सदस्याला चुकीचे काम करु देणार नाही, चुकीचे काम करणार्‍या सदस्यांची कामे अडविल्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीत खदखद निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात, भारत भवार, बापूराव त्रिभुवन, विलास दाभाडे, विनोद रणनवरे, सदस्य सुनील त्रिभुवन, अशोक कचे, भाऊसाहेब पटारे, जयकर मगर, मोहन रणनवरे, सुंदर रणनवरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर, उपाध्यक्ष विलास सपकळ, बापूसाहेब शिंदे, महेंद्र संत, गणेश गायकवाड, रघुनाथ शिंदे, जान रणनवरे, प्रणव अमोलिक, कान्हा खंडागळे मित्रमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Visits: 12 Today: 1 Total: 117207

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *