उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 35 हजार रुपयांची लाच घेताना नाशिक विभागाच्या पथकाची कारवाई

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील कोळपेवाडी येथील दारूच्या दुकानदाराकडून दारूविक्री व वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकार्यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाभळेश्वर कार्यालयात कार्यरत असलेले सहायक दुय्यम निरीक्षक राजेंद्र भास्कर कदम व सहायक दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते या अधिकार्यांनी तक्रारदारास कारमधून अवैध दारूची वाहतूक करताना पकडले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पकडलेली कार सोडविण्यासाठी तक्रारदार न्यायालयात गेला असता, कदम व परते यांनी त्याला, दारूविक्री व वाहतूक करावयाची असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत 60 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत ही रक्कम 35 हजारांवर आली.

सदर पैसे सोमवारी (ता. 27) आणून देण्यास सांगितले होते. तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्यासह पथकाला घेऊन बुधवारी (ता. 29) सायंकाळी चार वाजता कोळपेवाडी येथे सापळा लावला. यावेळी लाचखोर अधिकार्यांना पंचांसमोर लाच घेताना अटक केली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
