भाजपमधील बोलघेवडे पुढारी पडले तोंडघशी ः डॉ. कानवडे अकोलेतील लघु पाटबंधारे कार्यालय स्थलांतरणास स्थगिती

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले व संगमनेर येथील कार्यालय बंद करून नवीन कोपरगाव किंवा श्रीरामपूर येथे लघु पाटबंधारेचे कार्यालय सुरू करण्याचा भाजप सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने उखडून फेकला होता. या कार्यालयाला ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने अकोले येथे कार्यालय पुन्हा मिळविण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विशेष पाठपुरावा केल्याने अकोलेतील भाजपमधील बोलघेवडे पुढारी तोंडघशी पडले असल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डॉ. अविनाश कानवडे यांनी केली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. कानवडे यांनी म्हटले की, भाजप सरकारच्या कालावधीत अकोले व संगमनेरमधील लघु पाटबंधारे कार्यालय बंद करून कोपरगाव अथवा श्रीरामपूर येथे विभागीय कार्यालय सुरू करण्याचा घाट तत्कालीन आमदारांनी घातला होता. याबाबत तत्कालीन भाजप सरकारने आदेश काढून अंमलबजावणी देखील चालू केली होती. परिणामी अनेक कामे, कर्मचारी, ग्रामसेवक यांना लघु पाटबंधारे विभागातील कामांसाठी हेलपाटे मारावे लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मृद व जलसंधारण आणि ग्रामविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करून स्थलांतरित होणार्‍या अकोले कार्यालयाला स्थगिती मिळवली.

वास्तविक स्थलांतरणाचा हा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने काढला होता व भाजपचे काही बोलघेवढे पुढारी सोशल मीडियावरून हे कार्यालय स्थलांतरित होण्याच्या विषयावरून वाचाळपणा करीत होते. मात्र या निर्णयामुळे व परिश्रमामुळे अकोल्यातील त्या पुढार्‍यांचे दात घशात गेल्याचा टोला डॉ. कानवडे यांनी लगावला आहे. याचबरोबर अकोले मतदारसंघातील विकासाचा अनुशेष आमदार लहामटे नक्कीच भरुन काढतील असा विश्वासही कानवडे यांनी व्यक्त केला आहे.

Visits: 146 Today: 1 Total: 1414528

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *