अगस्ति सहा लाख टनावर गाळप नेणार ः गायकर अगस्ति सहकारी साखर कारखान्याची 28 वी वार्षिक सभा उत्साहात


नायक वृत्तसेवा, अकोले
कोणत्याही परिस्थितीत सहा लाख टनावर गाळप नेण्याचा अगस्ति सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा संकल्प असून साखर उतारा टिकवून ठेवून सभासदांना लाभ देण्याचा विश्वास अगस्तिचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी व्यक्त केला.

अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांची कामधेनू असलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखान्याची 28 वी सभासद मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.27) संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष अशोक भांगरे, मुधकर नवले, डॉ. अजित नवले, विठ्ठल चासकर, कारभारी उगले, वसंत मनकर, सुरेश गडाख, राजेंद्र डवरे, प्रकाश मालुंजकर, जालिंदर वाकचौरे, डॉ. मनोज मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, रामहरी तिकांडे, प्रकाश नवले, पांडुरंग नवले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले, अगस्ति कार्यक्षेत्रात उच्चांकी ऊस लागवड करण्याचा मानस आहे. 6 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचा आमचा निर्धार असून साखर उताराही चांगला ठेवण्याचा प्रयत्न आहे. 2500 रुपये भाव दिवाळीपूर्वी दिलेला आहे. तोटे सहन करून भाव दिला आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव देण्यात आम्ही अग्रेसर राहिलो आहे. आता सभासदांना चांगले बियाणे उपलब्ध करून देणार आहे. 6 लाख गाळप झाले तर आपण सर्व अडचणींवर मात करू असा विश्वासही व्यक्त केला. केंद्र सरकारच्या एफआरपी निर्णयाने कारखाने अडचणीत आले. दरवर्षी 25 कोटीचे कर्ज वाढते आहे म्हणून आम्ही सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन योग्य नियोजन करणार आहोत. व्याज कमी कसे होईल किंवा पगार कपात होणार नाही म्हणून कामगार वर्गात काही गैरसमज असेल तर तो काढून टाका. शेजारच्या कारखान्यांच्या तुलनेत आपण उसास भाव देत आलो आहे. शाश्वत पीक म्हणून ऊस लागवड मोठ्या प्रमाणत झाली पाहिजे त्यासाठी चांगल्या बियाणांची निवड करा असे आवाहन केले.

तर उपाध्यक्ष अशोक भांगरे यांनी सभासदांनी आमच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवला असून त्यांच्या विश्वासावर अगस्ति उर्जितावस्थेत आणण्याचा प्रयत्न करू. अहवालावर सुरेश नवले, प्रकाश नवले, भाऊसाहेब बराते, पांडुरंग नवले, संजय वाकचौरे, राजेंद्र कुमकर, जालिंदर वाकचौरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन एकनाथ शेळके यांनी वाचन केले. अहवाल वाचन कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सयाजी पोखरकर यांनी केले. यावेळी अगस्तिचे सर्व संचालक व ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.

Visits: 134 Today: 1 Total: 1415684

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *