देशातील अनेक व्यक्तिमत्त्व घडविण्यात पोस्टाचा वाटा : डॉ.संजय मालपाणी संगमनेर उपडाक घरच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिवसाचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर

पोस्टाच्या माध्यमातून अनेक पिढ्या लिहित्या झाल्या आणि त्यातूनच भाषा संस्काराचे धडेही मिळत गेले. शब्दरचना, शुद्धलेखन, ऊकार. वेलांट्या अशा सगळ्याच गोष्टींचा अभ्यास होवून त्यातून व्यक्तिमत्त्वही घडत गेली. देशातील अशा अनेक व्यक्ती घडवण्यात पोस्टाचा मोठा वाटा आहे. पोस्टाच्या माध्यमातून होणारे हे समाज शिक्षण खूप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन उद्योजक डॉ.संजय मालपाणी यांनी केले.

संगमनेर येथील मुख्य डाकघरच्यावतीने गुरुवारी राष्ट्रीय बालिका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीरामपूर उपविभागाचे डाक अधीक्षक हेमंत खडकीकर, संगमनेरचे सहाय्यक डाक अधीक्षक संतोष शिंदे, कोपरगावचे विनायक शिंदे व तान्हाजी शिंदे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी पोस्टाच्यावतीने डॉ.मालपाणी यांची छबी असलेले पोस्टाचे तिकीटही प्रसिद्ध करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना डॉ.मालपाणी म्हणाले की, आत्तापर्यंतच्या पिढीतील बालमनापासून होणार्‍या संस्कारांमध्ये पोस्टाचा मोठा वाटा आहे. त्याच संस्कारातून आपल्याला पोस्टाची तिकीटं जमा करण्याचा छंद जडला होता. लहानपणी जेव्हा अशा तिकीटांचा संग्रह करायचो तेव्हा स्वप्नातही कधी वाटले नव्हते की एक दिवस पोस्टाकडून आपलेच तिकीट प्रसिद्ध केले जाईल. यावेळी त्यांनी पोस्ट आणि समाज यांच्यातील नात्याची घट्ट विणही विविध दाखल्यांसह उपस्थितांना उलगडून सांगितली. अनेकांच्या जीवनात अर्थ निर्माण करणार्‍या खात्यांमध्ये पोस्टाचा समावेश असल्याचे सांगतांना त्यांनी दररोज तयार होवून पोस्टात जाणार्‍या आजोबा आणि त्यांच्या नातवाचे उदाहरणही यावेळी सांगितले. सुमारे दीडशेहून अधिक वर्षांपासून पोस्टाने नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या आहेत, त्याचे महत्त्व फार मोठे आहे. पोस्टातील पोस्टमनची भूमिका अतिशय महत्त्वाची असून एखाद्या गावातील पोस्टमन म्हणजे त्या गावचा माहिती कोशच असल्याचेही त्यांनी काही उदाहरणांवरुन सांगितले. आरोग्यम् धन संपदा हा मंत्र सोबत घेवून आपण आपल्या मुलींना सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगताना डॉ.मालपाणी म्हणाले की, आपली मुलं मैदानावर खेळण्यासाठी जायलाच हवीत. खेळणं हा मुलांचा अधिकारच असायला हवा. मुलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम, योगासन व सूर्यनमस्कारांचीही गरज असून पालकांनी आपल्या पाल्यांकडून नियमित व्यायाम करुन घेतला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ.मंगरुळे यांनी आपल्या मनोगतामध्ये राष्ट्रीय बालिका सप्ताहाचे निमित्त साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. महिला व बालिकांच्या सक्षमीकरणासाठी पोस्टाने राबविलेल्या योजना उत्तम असल्याचे सांगताना त्यांनी परिवर्तन आणि स्थित्यंतर अनुभवणारा विभाग असलेल्या पोस्टाने कालानुरुप केलेल्या बदलांचाही उल्लेख केला. राष्ट्रीय जनगणनेच्या तुलनेत राज्यातील महिला व पुरुषांची संख्यात्मक स्थिती काहीशी चांगली असली तरीही समाधानकारक मात्र नाही. अशा स्थितीत स्त्री व पुरुषांमध्ये फारसे अंतर नाही ही गोष्ट समाजात रुजण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. संगमनेरचे सहाय्यक डाक अधीक्षक संतोष जोशी यांनी प्रास्तविक केले, अमित देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करवून दिला तर हेमंत खडकीकर यांनी आभार मानले.
यावेळी महिला व बालिकांच्या सक्षमीकरणासाठी पोस्टाने राबविलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार्‍या नवनाथ कहांडळ व कल्पेश मेहेत्रे यांच्यासह उत्कृष्ट पोस्टमन म्हणून भूमिका बजावणार्‍या हरीभाऊ वर्पे व ज्ञानेश्वर कुरकुटे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सुकन्या योजनेत आपल्या बालिकांचे खाते उघडणार्‍या पाच पालकांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमात पहिल्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण यश संपादन करणार्‍या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तृप्ती डोंगरे, स्वरा गुजर व तन्वी रेडीज् या मुलींनी योगासनांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी संगमनेर उपडाक घरच्यावतीने या तिन्हीही राष्ट्रीय योगासन खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.

Visits: 21 Today: 2 Total: 115374

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *