भंडारदरा जलाशयाच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविणार ः पाटील राजूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनंतर पत्रकारांशी पोलीस अधीक्षकांचा संवाद

नायक वृत्तसेवा, अकोले
भंडारदरा जलाशयाच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून त्याबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही. याचबरोबर जिल्ह्यात पोलिसांचा तुटवडा लक्षात घेवून 500 पोलीस कर्मचारी मिळावेत यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.

अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील नुकतेच आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी राजूर पोलिसांनी सलामी देऊन पोलीस अधीक्षक पाटील यांचे स्वागत केले. तर अकोले तालुका पत्रकार संघाने जिल्हा त्यांचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन आदरातिथ्य केले.

राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी संपूर्ण अहवाल सादर केला. त्यानंतर पत्रकारांनी अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या ब्रिटीशकालीन ‘विल्सन डॅम’ अर्थात भंडारदरा जलाशयाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. त्यावर जलाशयाची भिंत व जलाशय परिसरात येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तींवर पोलिसांचे लक्ष असून यापुढे कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. तसेच हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर देखील दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तर केंद्र व राज्य तपासणी विभागाने काही त्रुटी राहिल्या आहेत त्याचा अहवाल दिला आहे. त्याची लवकरच पूर्तता करण्यात येईल, असेही शेवटी सांगितले. यावेळी संगमनेर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राजूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व विद्यमान नरेंद्र साबळे यांनी पोलीस ठाण्याची प्रतिमा उल्लेखनीय कामकाजातून सुधारली आहे. त्यामुळेच हे पोलीस ठाणे राज्यात पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविण्यासाठी पात्र ठरले. याचा संपूर्ण पोलीस दलाला अभिमान असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राजूर पोलिसांच्या समस्या जाणून घेतल्या.

Visits: 187 Today: 1 Total: 1983872

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *