कृतघ्न मुलाने व सूनांनी जन्मदात्या आईला घराबाहेर काढले राहुरी पोलिसांत ज्येष्ठ नागरिक कल्याण व संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहुरी
जिने जन्म दिला, जग दाखवलं, बोटाला धरून चालायला शिकवलं. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन, बालहट्ट पुरविले पंखात बळ भरले लहानाचे मोठे केले त्याच जन्मदात्या वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलून दिले असा कृतघ्न मुलगा व दोन सूनांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक कल्याण व संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शरद सखाराम भोसले (मुलगा), सविता शरद भोसले, सुनीता दिनेश भोसले (सूना, सर्वजण रा. आंबी-दवणगाव, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत.
दवणगाव येथे मालनबाई सखाराम भोसले (वय 65, रा. आंबी-दवणगाव) पती, दोन मुलगे व दोन सूना यांच्यासमवेत घरात राहतात. वयाच्या 65 व्या वर्षीही मालनबाई शेतमजुरी काम करतात. त्या रविवारी (ता. 17) दुपारी दोन वाजता रणरणत्या उन्हात शेतमजुरी कामावरून घरी परतल्या. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. जेवायला मागितल्यावर मुलगा शरद व दोन सूनांनी शिवीगाळ सुरू केली. तू येथे राहायचे नाही. तुला जेवण भेटणार नाही. असे म्हणून तिघांनी लाथाबुक्क्यांनी, चापटांनी मारहाण केली. घराबाहेर हाकलून दिले. तू पुन्हा घरात आलीस. तर तुला जिवंत सोडणार नाही. असा दम दिला. उपाशीपोटी विमनस्क अवस्थेत घराबाहेर पडलेल्या मालनबाईंनी थेट राहुरी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना आपबीती सांगितली. त्यांनी घटनेची चौकशी करून खात्री केली. मग कायद्याचा बडगा उगारला. आईच्या फिर्यादीवरून मुलगा व दोन सूनांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
आई या दोन अक्षरांत आत्मा व ईश्वर सामावला आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ अशी म्हण प्रचलित आहे. प्रत्येक धर्मात व जातीत आईला सर्वोच्च स्थान आहे. दवणगाव येथे जन्मदात्या वृद्ध आईला मुलगा व सूनांनी मारहाण करून, उपाशी पोटी घराबाहेर काढले. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे.
ज्येष्ठ नागरिक, आईवडील यांच्या कल्याण व संरक्षण संदर्भात कायद्यात तरतूद आहे. वृद्धपकाळात आधाराच्या काठीने निराधार केले, अन्याय केला तर ज्येष्ठ पीडितांनी कायद्याचा आधार घ्यावा. नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
– प्रताप दराडे (पोलीस निरीक्षक, राहुरी)