भाजप साडेतीन दशकानंतर लढवणार संगमनेर विधानसभा? शिवसेनेचे अस्तित्त्व शून्य; डॉ.सुजय विखेंच्या वक्तव्याने मिळाले बळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर आता राज्यातील विधानसभेच्या तयारीला वेग आला असून राजकीय पक्ष आघाडी व युतीच्या वाटाघाटीत व्यस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. अशातच गुरुवारी माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवताना संगमनेर व राहुरी मतदार संघात चाचपणी सुरु असल्याचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत. मागील साडेतीन दशकांपासून भाजप-शिवसेना महायुतीच्या माध्यमातून एकवेळचा अपवाद वगळता संगमनेरची जागा शिवसेनेनेच लढवली आहे. मात्र विखे पाटलांनी एकप्रकारे ‘संगमनेर’च्या जागेवर दावा केल्याने तीन दशकांत एकदाही कडवी लढत देण्यात अपयशी ठरलेल्या शिवसेनेकडून संगमनेरची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी 1990 च्या निवडणुकीत भाजपकडून वसंतराव गुंजाळ यांनी या जागेवरुन उमेदवारी केली होती.

संगमनेर विधानसभा मतदार संघ माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळखला जातो. 1978 साली काँग्रेसने बी.जे.खताळ पाटील यांच्याऐवजी भाऊसाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर खताळांनी ती निवडणूक जनता पार्टीकडून लढवली होती. त्या निवडणुकीत थोरात यांनी त्यांचा 1101 मतांनी पराभव केला. मात्र त्यानंतर दोनच वर्षांनी 1980 साली झालेल्या निवडणुकीत खताळ यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे तिकिटं मिळवून त्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या संभाजीराव थोरात यांचा 2040 मतांनी पराभव करीत पुन्हा विधानसभा गाठली.

पुढे 1985 साली बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळावी यासाठी संगमनेरातील कार्यकर्त्यांची मागणी अमान्य करीत काँग्रेसच्या वरीष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष करीत शकुंतला थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे थोरात यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात शड्डू ठोकून तब्बल 10 हजार 159 मतांनी त्यांचा पराभव करीत विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यावेळी ज्येष्ठनेते शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून गंगाधर आंधळे यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र त्यांना अवघी 15 हजार 208 (16.8 टक्के) मतं मिळाली.


1990 च्या दशकांत राज्यात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती करीत राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि संगमनेर विधानसभा मतदार संघासाठी वसंतराव गुंजाळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या बाळासाहेब थोरात यांना कडवी झूंज देत 52 हजार 603 (45.5 टक्के) मिळवली. तर, थोरात यांनी 57 हजार 665 (49.7 टक्के) मतं मिळवताना गुंजाळ यांचा 5 हजार 62 मतांनी पराभव करीत सलग दुसर्‍यांदा विधानसभा गाठली. या निवडणुकीनंतर भाजप-सेनेत वाटाघाटी होवून संगमनेर विधानसभेची जागा 1995 पासून शिवसेनेला देण्यात आली. तेव्हापासून हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र त्यांना आजवरच्या एकाही निवडणुकीत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना कडवी झूंज देता आली नाही.

2014 सालच्या निवडणुकीपूर्वी सलग सत्तेमुळे देशात आणि राज्यात काँग्रेसविषयी नकारात्मकता निर्माण झाली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याने भाजपने वाटाघाटीत शिवसेनेला दुय्यम स्थान देण्याच्या प्रकारावरुन त्यांच्यातील चर्चा फिसकटली आणि विरोधकांसाठी अनुकूल वातावरण दिसत असतानाही राज्यात भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. त्यात संगमनेरात भाजपकडून राजेश चौधरी तर, शिवसेनेकडून जनार्दन आहेर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. या निवडणुकीतही आमदार बाळासाहेब थोरात यांनी तब्बल 58 हजार 508 मतांनी आहेर यांचा पराभव करीत संगमनेर मतदार संघावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. या निवडणुकीत आहेर यांना 44 हजार 759 तर, चौधरी यांना 25 हजार 7 मते मिळाली होती.


गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसनेच्या 25 वर्षांच्या नात्याला तडा गेला. त्यामुळे 2019 सालची निवडणूक एकत्रित लढवून बहुमत मिळालेले असतानाही राज्यात भाजप-सेनेचे सरकार स्थापन होवू शकले नाही. त्यातून राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आकाराला आली आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. अडीच वर्ष त्यांचे सरकार चालल्यानंतर तत्कालीन गृहविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या 40 आमदारांसह बंडखोरी करीत सरकार पाडले आणि त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. या कालावधीत निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्याकडे सोपवले.


राज्यात सरकार स्थापन करुन मूळ शिवसेनाच ताब्यात घेतलेल्या एकनाथ शिंदे यांना संगमनेरात मात्र आपल्या गटाचा ‘जम’ बसवता आला नाही. त्यातच केवळ मोदी लाटेवर स्वार होवून दोनवेळा लोकसभेत पोहोचलेल्या माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी गटातटाच्या राजकारणाला हवा दिल्याने जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद क्षीण झाली. त्यातही बहुतेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिल्याने शिंदेसेनेला जिल्ह्यात दाधिकारी मिळणंही दुरापास्त झालं. ज्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली, त्यांना गटबाजीचा सामना करावा लागल्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या कुणब्यात दाखल झालेल्यांची मोठी कुंचबणा झाली. त्यातील बहुतेकांनी राजीनामे देत राजकारणातूनच बाजूला होण्याचे निर्णय घेतले.

परिणामी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची वाणवा असलेल्या शिवसेनेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासूनच संगमनेर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु झाले. मात्र त्याला नेमकी दिशा मिळत नसल्याचेही वेळोवेळी समोर आले. एकतर तालुक्यात पदाधिकार्‍यांसह शिंदेसैनिकांचाच अभाव आणि त्यात भाजपमध्ये दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव यामुळे यंदाच्या निवडणुकीत संगमनेर विधानसभेची जागा शिवसेनेकडून भाजपच्या वाट्याला जाईल असे अंदाजही वर्तवण्यास सुरुवात झाली. आतातर थेट माजी खासदार आणि विखे पाटील यांचे सुपूत्र डॉ.सुजय विखे पाटील यांनीच ‘संगमनेर’ किंवा ‘राहुरी‘तून विधानसभा लढवण्याची इच्छा जाहीर केल्याने संगमनेर भाजपच्या मागणीला एकप्रकारे बळ मिळाले आहे. त्यामुळे येणार्‍या कालावधीत महायुतीच्या जागा वाटपात संगमनेरची जागा भाजपच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


गुरुवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना डॉ.सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याचा मनसुबा जाहीर करताना कोपरगाव व श्रीरामपूर मतदार संघाच्या अडचणी सांगत आपल्यासमोर ‘संगमनेर’ व ‘राहुरी’चा पर्याय असल्याचे सांगितले होते. राहुरीत माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यातील राजकीय वादही बोलून दाखवल्याने ते संगमनेरमधून लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. मात्र त्याचवेळी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय न झाल्यास व आपल्या नावावर कार्यकर्त्यांचे एकमत झाल्यास आपण रिंगणात उतरु अशी पृष्टीही त्यांनी जोडल्याने संगमनेरात उमेदवार कोणीही असला तरीही येथील जागा मात्र भाजपच्या पारड्यातच जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 38 Today: 1 Total: 114931

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *