दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना सोनई पोलिसांचे अभय जिल्हा पोलीस प्रमुखांनी सखोली चौकशी करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पानेगाव येथील पत्रकार बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांचा मालकीच्या क्षेत्रातील गहू हार्वेस्टरच्या साह्याने 7 व 11 एप्रिल, 2022 रोजी दहा जण चोरुन काढत होते. हा गंभीर प्रकार सोनई पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. परंतु, आर्थिक तडजोडीतून त्यांना अटकेपासून अभय दिल्याचा आरोप पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी केला आहे.

पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांच्या मालकी क्षेत्रातील गहू संतोष मच्छिंद्र नवगिरे, संपत अशोक मते, गणेश अशोक मते, बाबासाहेब अशोक मते, अशोक गंगाधर मते, कडूबाई अशोक मते, रोहिणी बाबासाहेब मते, सविता गणेश मते, सीमा संतोष नवगिरे, गोविंद पांडुरंग आसने हे काढत होते. त्यावेळी तत्काळ सोनई पोलीस ठाण्यास कळविले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल व पथकाने वरील आरोपींना रंगेहाथ पकडले. तसेच काढलेला गहू, हार्वेस्टर व आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे चित्रीकरण केले. परंतु, पोलिसांनी आर्थिक तडजोड करुन त्यांना मुक्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा गंभीर प्रकार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या निदर्शनास आणून देत 12 एप्रिलला 395, 379 504, 506 सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नसून राजरोसपणे गावात फिरून आरोपी संपत मते, बाबासाहेब मते हे धमकावत असल्याचे बाळासाहेब नवगिरे यांनी सांगितले आहे.

यामुळे संतप्त झालेल्या नवगिरेंनी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गंभीर प्रकार घडूनही पोलिसांनी केवळ आर्थिक तडजोडीतून आरोपींना अटकेपासून अभय दिल्याचा आरोप केला आहे. यामुळे आरोपींचे चांगलेच फावले असून त्यांची मजल धमकीपर्यंत गेली असल्याचे नवगिरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

Visits: 186 Today: 1 Total: 1590309

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *