हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल मिटकरींची आमदारकी रद्द करा! संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानची गंभीर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथील जाहीर सभेत हिंदू विवाह विधीची टिंगल टवाळी करून तमाम हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्या असून जातीय तेढ निर्माण करणारे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांच्या विकृत वक्तव्याने लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे तसेच आमदार म्हणून घेतलेल्या शपथेचा उघड उघड भंग झाला असल्याने राज्यपाल महोदयांनी मिटकरी यांची आमदारकी तातडीने रद्द करावी, अशी मागणी पुरोहित प्रतिष्ठानचे (संगमनेर पुरोहित संघ) अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केली आहे.
सार्वजनिक व्यासपीठावरून हिंदू विवाह विधीबद्दल लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करणारे तसेच पुरोहितांच्या विरोधात प्रतिमा मलीन करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याने अशा व्यक्तीने आमदारपदी राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे अशी खरमरीत टीका जाखडी यांनी केली आहे. जाती-जातीत लावालावी करण्याचा निषेधार्ह प्रयत्न केल्याबद्दल मिटकरी यांनी केवळ पुरोहित अथवा हिंदू यांची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी असेही आग्रही मत जाखडी यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहात असताना मिटकरी यांच्या जहाल व चिथावणीखोर वक्तव्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुळात भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या आदर्श तत्वानुसार सर्वच लोकप्रतिनिधींनी आपले आचार विचार, भाषण, संभाषण याबाबत काटेकोर दक्षता घेणे अपेक्षित आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यातून कोणत्याही प्रकारे कायदेभंग होऊ नये. अथवा कोणताही धर्म, जात यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असे अभिप्रेत आहे. नेमक्या या सर्व बाबींचे भान न राहिल्याने सांगली येथील जाहीर सभेत मिटकरी यांनी लोकप्रतिनिधीला अशोभनीय वक्तव्य केले आहे. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावणे आदी कलमानुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशीही मागणी जाखडी यांनी केली आहे.
केवळ माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही तर मिटकरी यांची आमदारकी रद्द करावी म्हणजे त्यांच्या विकृत वक्तव्याबद्दल त्यांना अद्दल घडेल आणि पुन्हा कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना आपली जीभ सैल सोडणार नाही. पुरोहित प्रतिष्ठान या विषयाचा निकाल लावल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. अर्धवट माहितीच्या आधारे हिंदू विवाह विधीची टवाळी करणार्या मिटकरी यांनी बिनचूक व शास्त्र शुद्ध माहिती घेण्यासाठी संगमनेरमध्ये जरूर यावे. त्यांच्या अपुर्या आणि पूर्वग्रहदूषित अज्ञानाला दूर करण्याचे काम पुरोहित प्रतिष्ठान नक्की करेल असेही जाखडी यांनी म्हंटले आहे.