शरद पवारांकडून अकोलेत भांगरे कुटुंबियांना ताकद? आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता


नायक वृत्तसेवा, अकोले
आपल्याला सोडणार्‍या राज्यातील अनेक आमदारांच्या विरोधात दिग्गज नेते शरद पवार यांनी आत्तापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अकोलेत आमदार डॉ. किरण लहामटेंना शह देण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे व त्यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्या तथा अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांना ताकद देण्याचे ठरविल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मतदारसंघातील समीकरणे आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे.

आपले काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आव्हान देऊन स्वतःची वेगळी चूल मांडणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संख्याबळाच्या लढाईत बाजी मारली आहे. अजित पवारांकडे सध्या 35 तर शरद पवार यांच्याकडे 13 आमदार असल्याचे स्पष्ट झाले. यात अहमदनगर जिल्ह्यात दोघांची ताकद ‘फिफ्टी-फिफ्टी’ झाली आहे. जिल्ह्यातील आमदार आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे आणि नीलेश लंके यांना आपल्याकडे वळविण्यात अजित पवारांना यश आले आहे. पण ही बाब शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असून अकोलेत आत्तापासूनच आपलं गणित मांडण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गाठीभेटींचा सिलसिला देखील सुरू झाला आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे हे प्रथम अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते. नंतर त्यांनी आपली भूमिका बदलवत शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. पुढे अजित पवार व त्यांच्या समर्थकांनी आमदार लहामटे यांच्याशी संपर्क करत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. आमदार लहामटेंनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक भांगरे यांचे सुपुत्र जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे व अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांनी शरद पवार यांची या पार्श्वभूमीवर मुंबई येथे दुसर्‍यांदा भेट घेतल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भांगरे कुटुंबातील मायलेकांपैकी कुणा एकाला शरद पवार हे उमेदवारी देऊन आपली राजकीय ताकद त्यांच्या पाठिशी उभी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23108

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *