मंदिरे बंदच; शिर्डी, पंढरपूरसाठीच्या गाड्या रद्द करण्याची ‘रेल्वे’वर वेळ आठ गाड्या महिनाखेरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय; प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनासंबंधीचे निर्बंध शिथील केल्यानंतर मंदिरेही सुरू होतील, या आशेने मध्य रेल्वेने सुरू केलेल्या विशेष रेल्वे गाड्या आता रद्द करण्याची वेळ आली आहे. मुंबईहून शिर्डी आणि पंढरपूरसाठी सुरू करण्यात आलेल्या आठ गाड्या मध्य रेल्वेने सप्टेंबरअखेरपर्यंत रद्द केल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून कळविण्यात आले आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रेल्वेनेही काही गाड्या टप्प्याटप्याने सुरू केल्या. त्यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश होता. मात्र, मंदिरेच बंद असल्याने या गाड्यांना प्रवासी मिळत नाहीत. नजीकच्या काळात मंदिरे खुली होण्याची शक्यताही दिसत नसल्याने रेल्वेने यातील आठ गाड्या महिनाखेरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई (दादर)-पंढरपूर एक्सप्रेस आठवड्यात प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावत होती. ही गाडी 5 ते 27 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. पंढरपूर-मुंबई (दादर) एक्सप्रेस आठवड्यात प्रत्येक मंगळवारी, शनिवारी आणि सोमवारी धावत होती. ती 6 ते 28 सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे. मुंबई (दादर)-साईनगर शिर्डी एक्सप्रेस आठवड्यात प्रत्येक मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावत होती. ही गाडी 7 ते 30 सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे.
साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस आठवड्यात प्रत्येक बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावत होती. ही गाडी 8 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात रद्द करण्यात आली आहे. मुंबई (दादर)-साईनगर शिर्डी विशेष एक्सप्रेस धावत होती. ही गाडी 8 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे. साईनगर शिर्डी-दादर विशेष एक्सप्रेस धावत होती. ही गाडी 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे. दादर-साईनगर शिर्डी विशेष एक्सप्रेस धावत होती. ही गाडी 10 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे. साईनगर शिर्डी-दादर विशेष एक्सप्रेस धावत होती. ही गाडी 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घेऊन रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.