शिवसैनिकांच्या घोषणांनी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख प्रभावित! शिवसंपर्क अभियानाची अकोले येथून सुरूवात; शिवसेना घराघरांत पोहोचविण्याचा निर्धार
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्याला चळवळींचा मोठा इतिहास आहे. हा क्रांतीचा तालुका आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियानाची सुरूवात अकोल्यातून होत असून मी येथे केवळ भाषण देण्यासाठी आलो नसून मी तुमच्याशी हितगुज साधणार आहे. खरंतर आज मी तुमच्या घोषणांनीच प्रभावित झालो आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी काढले.
सोमवारी (ता.12) अकोले येथून शिवसंपर्क अभियानाची सुरूवात करण्यात आली. यानिमित्त आयोजित मेळाव्याच्या अध्यस्थानी शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे होते. तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, नगरसेवक प्रमोद मंडलिक, नितीन नाईकवाडी, प्रदीप हासे, रामहरी तिकांडे आदिंसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री गडाख म्हणाले की, सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना 24 हजार कोटींची कर्जमाफी केली. कोरोना महामारीच्या काळात ठाकरे सरकारने अतिशय चांगले काम केल्याने केंद्र शासनाने अनेकदा त्यांचे कौतुक आणि गौरव केला. त्याची दखल घेवून जागतिक पातळीवर देखील त्यांचा लौकिक झाला. त्याचा राज्यातील तमाम शिवसैनिकांना स्वाभिमान वाटतो. म्हणूनच आजपासून आपण सर्वांनीच शिवसेना संपर्कातून गावागावांत व मनामनात शिवसेना भरवण्याचे काम सुरू करायचे आहे. तसेच सदस्य नोंदणीचे काम देखील करावयाचे आहे. मी तुमच्यासाठी तुमचा आमदार म्हणून काम करेन, तुम्हांला आमदार नाही असे समजू नका. एमआयडीसीसाठी देखील आपले प्रयत्न चालू आहेत. महिला बचत गटांसाठी त्यांना कर्ज देणे, त्यांच्या मालाला मार्केट शोधून देण्याचे काम आपण येत्या काळात करणार आहोत असे त्यांनी सांगितले. याचबरोबर छोट्या तलावांच्या देखभाल दुरूस्तीसाठी 3-4 कोटी निधी मंजूर आहे. गोदावरी खोरे सोडून नवीन सहा कोटींचे बंधारे मंजूर आहेत. ती सर्व कामे येत्या काळात करायची आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावांत, घराघरांत आपल्या कामाची माहिती पोहोचवली पाहिजे अशी अपेक्षा शेवटी मंत्री गडाख यांनी व्यक्त केली.
खासदार लोखंडे यांनी अध्यक्षीय भाषणात मिनी एमआयडीसी आणि अकोले-देवठाण मधून पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी प्रयत्न क रणार असून तोलार खिंडीतून मुंबई मार्ग काढण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मंजुरी घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी बारमाही काँक्रिटचे रस्ते करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करणार असल्याचेही सूतोवाच लोखंडे यांनी यावेळी केले. प्रास्ताविक मच्छिंद्र धुमाळ यांनी केले. अध्यक्षीय सूचना रामहरी तिकांडे, अनुमोदन माधव तिटमे यांनी दिले. याप्रसंगी महिला आघाडीच्या मंगला शेलार, अनिता मोरे, महेश देशमुख, महेश हासे, संदेश एखंडे, भाऊसाहेब गोर्डे, संतोष मुर्तडक, तेजस नवले, सीताराम शेटे, नंदू वाकचौरे, अजय वर्पे, सर्व शाखाप्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख, विभागप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप हासे यांनी केले.