संगमनेरातील वाळुचोर ठरलेत प्रशासनालाही ‘वरचढ’ आर्थिक हितसंबंधाच्या आडून दिवसाढवळ्या प्रवेरच्या पात्रावर पडतायेत दरोडे


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नद्यांच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह खालावताच शहरालगतच्या प्रवरानदीपात्रात वाळुवर दरोडे पडायला सुरुवात झाली आहे. मात्र दिवसाढवळ्या सुरु असलेली ही लुट सर्वसामान्य संगमनेरकर वगळता शासकीय अधिकार्‍यांना दिसतच नसल्याने प्रशासनावर ‘वरचढ’ ठरलेले वाळु तस्कर नागरिकांचा विरोध झुगारुन पुन्हा एकदा घाट कोरण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. वारंवार तक्रारींचा पाढा वाचून, लेखी, तोंडी आणि ऑनलाईन अशा सगळ्याच माध्यमातून तक्रारी करुनही गेंड्याची कातडी पांघरल्याचे सोंग घेवून ‘रसगुल्ले’ खाणार्‍या प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला असून या दरोडेखोरांना महसुल खात्यातील वरीष्ठांसह पोलीस खात्यातील अधिकार्‍यांचे आर्थिक पाठबळ असल्याच्या आरोपांमध्ये सत्यता असल्याचे दिसू लागले आहे.


संगमनेर शहरातून वाहणार्‍या प्रवरा नदीला गेल्या महिनाभर मोठ्या प्रमाणात पाणी होते. नदीला पूर म्हणजे वाळु तस्करांची दिवाळी असे गणित असते. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असले की त्या वेगवान प्रवाहासोबत नवीन वाळुही येत असते. त्यामुळे गेल्या वर्षभरात संगमनेरातील वाळु चोरांनी पात्रात जागोजागी दरोडे घालून घायाळ केलेल्या अमृतवाहिनीच्या सगळ्या जखमा या पूराच्या पाण्याने भरुन काढल्या. त्यामुळे शहरातील शंभरावर वाळु चोर नदीभोवती घिरट्या घालीत पाण्याची पातळी कमी होण्याचीच प्रतिक्षा करीत होते.


गेल्या चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातून वाहणार्‍या प्रवरेचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडल्याने त्या त्या भागातील वाळु तस्करांचे हातपाय हलायला सुरुवात झाली आहे. संगमनेर शहरालगतच्या नदीपात्रातून मात्र अहोरात्र बेसुमार वाळु उपसली गेल्याने या भागातील पाण्याचा निचरा होण्यास मोठा कालावधी लागतो. त्यामुळे वाळु तस्करांना सहजपणे वाळु काढण्यास अडचण होते, मात्र त्यामुळे आपला बेकायदा धंदा बंद करतील ते वाळु तस्करच कसले.


दक्षिण नगर जिल्ह्यात धरणांचा फुगवटा असल्याने भिमा, गोदावरी सारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रातून वाळु काढण्यासाठी बासेटींचा वापर केला जातो, उत्तर नगरमध्ये मात्र अद्यापपर्यंत बोटींचा वापर केला गेला नाही. मात्र बोटींप्रमाणेच लाभ देणार्‍या वाहनांच्या टायरचा मात्र सध्या सर्रास आणि दिवसाढवळ्या वापर करुन मोठ्या प्रमाणात घाटांच्या कपारीतूनच वाळु काढली जात आहे. त्यामुळे प्राचीन महत्त्व सांगणार्‍या या घाटांचे आयुष्यच धोक्यात आले असून हे कृत्य पाहणारे संगमनेरकर दररोज हळहळत आहेत, मात्र त्याचा प्रशासनातील महसुल आणि पोलीस विभागावर कोणताही परिणाम होताना दिसत नसल्याचेच चित्र आहे.


गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास गंगामाई घाटाच्या परिसरात रिक्षातून वाळु वाहतुक करणार्‍या दरोडेखोरांनी घाटावरच राजरोसपणे वाळुच्या गोण्याभरुन त्याची भलीमोठी रास उभी केली होती. ही गोष्ट एका पत्रकाराच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधित वाळुचोरी रोखण्याची थेट जबाबदारी असलेल्या अधिकार्‍याला याची माहिती दिली. त्यांनीही त्याला प्रतिसाद देत तात्काळ (म्हणजे एका तासाने बरं) तेथे कोणा तलाठ्याला पाठवले. मात्र ‘तो’ तलाठी येण्यापूर्वीच घाटावर रास मांडलेल्या पन्नासाहून अधिक वाळुच्या गोण्या आणि नदीपात्रात वाहनाच्या टायरसह उतरलेले ‘ते’ सात दरोडेखोर तेथून जादूगाराप्रमाणे अदृष्य झाल्याचे निरीक्षण त्या तलाठ्याने नोंदविले, आणि चक्क तसाच अहवाल त्याला नदीवर पाठविणार्‍या अधिकार्‍याला सोपविला. यावरुन संगमकनेरच्या वाळुचोरीचा इतिहास उलगडण्यास मोठा वाव आहे.


संगमनेरातील पर्यावरणप्रेमींनी किमान शहरालगतच्या नदीपात्रातील वाळु तस्करी थांबवण्याची वारंवार मागणी केली आहे. मध्यंतरी तर एका वरीश्ठ अधिकार्‍याने नदीपात्रालगत तलाठ्यांना ‘तैनात’ करण्याचेही फर्मान सोडले होते, मात्र आठच दिवसांत पूराच्या पाण्यात ते वाहून गेले, त्यामुळे आता प्रशासनालाच वरचढ ठरलेले वाळुचोर सामान्यांच्या विरोधाला धमकावण्याची भाषा करीत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या प्रवरेच्या पात्रावर दरोडे घालीत आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने सबकुछ अलबेल आहे.

संगमनेरच्या वाळुची महती खुप मोठी आहे. या वाळुने अनेक कार्यकर्त्यांच्या घरात समृद्धी पोहोचवली आहे, तर यापूर्वी संगमनेरात आलेले असंख्य अधिकारीही करोडपती होवूनच माघारी परतले आहेत. वाळु तस्करी रोखण्याचे थेट अधिकार असलेल्या अधिकार्‍यांना संगमनेरात बदली हवी असल्यास मोठी रक्कम मोजावी लागते, त्यामुळे येथे आल्यानंतर असे अधिकारी आधी मोजलेल्या रकमेसह दहा-वीस पट अधिक वसुली करण्यातच व्यस्त असतात. बदलीसाठी पैसे घेणार्‍यांचे हात आधीच बरबटलेले असल्याने या कृत्यावर कारवाई करण्याचे नैतिक अधिकारही त्यांनी गमावलेले असतात, संगमनेर तालुक्यात याच सूत्राचे पदोपदी दर्शन घडत आहे.

Visits: 52 Today: 1 Total: 432211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *