पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन तिसर्या दिवशी अधिक तीव्र उसाची प्रतीकात्मक होळी करुन दुधाचेही केले फुकट वाटप
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकर्यांनी आपल्या 14 मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाच्या तिसर्या दिवशी शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्य सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उसाची होळी करण्यात आली तर दुधाचे फुकट वाटप करण्यात आले.
शुक्रवारी (ता.3) सकाळी 10 वाजता शेतकरी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी एकत्र आले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिल्लक राहिलेल्या उसाला प्रतिहेक्टरी 2 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच ऊसतोडीसाठी विलंब झालेल्या शेतकर्यांना प्रतिटन 1000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आंदोलक शेतकर्यांनी केली. सरकारचा निषेध म्हणून त्यांनी उसाची प्रतीकात्मक होळी करून तीव्र भावना व्यक्त केल्या.
दुधाचे दर कमी झाले असून दूध उत्पादक अडचणीत आहे. दुधाला हमी भाव मिळावा शासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल शेतकर्यांनी फुकट दुधाचे वाटप केले. शिवसनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी पुणतांबा येथे येऊन धरणे आंदोलन करणार्या शेतकर्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. खेवरे यांच्यासोबत विजय शिरसाठ, भागवत मुंगसे, भानुदास तमनर, सुनील शेलार होते. नाशिक जिल्ह्यातील मांडवड (ता. नांदगाव) येथील हंसराज वडघुले, सुनील आंबेकर, विठ्ठल आहेर, अशोक निकम, दत्तात्रय निकम, राजेंद्र आहेर, विजय आहेर यांनी धरणे आंदोलन करणार्या शेतकर्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यावेळी शुभांगी माने या युवतीने शेतकर्यांच्या अडचणींवर शेतकरी गीत सादर करून उपस्थित आंदोलकांची मने जिंकली.
वाकडी येथील शेतकर्यांनीही शुक्रवारी पांठिबा जाहीर केला. यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, सुभाष वहाडणे, धनंजय जाधव, अॅड. मुरलीधर थोरात यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. परवा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणतांबा येथे येऊन धरणे आंदोलन करणार्या शेतकर्यांची भेट घेतली. मात्र कोणतेही ठोस आश्वासन न दिल्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे शासन या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तसेच पुणतांब्याच्या धरणे आंदोलनाला आजही जिल्हा व राज्यभर 2017 च्या शेतकरी संपाप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आंदोलन करणारे शेतकरीही अस्वस्थ झाले असून 5 जूनपर्यंत सरकारने योग्य पावले उचलली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे 6 जूननंतर आंदोलक शेतकरी कोणते आंदोलन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी दुपारच्या जेवणाची गावातील काही ग्रामस्थांनी व्यवस्था केली होती.