… तर खासदार विनायक राऊतांविरूद्ध दशक्रिया करू! अहमदनगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचा इशारा

नायक वृत्तसेवा, नगर
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर नाभिक समाजाच्या नाराजीचे प्रकरण ताजे असतानाच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. ‘आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा अहमदगरमध्ये त्यांच्याविरूद्ध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अहमदनगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिला आहे.

यासंबंधी जोशी यांनी सांगितले की, 23 मार्चला एका भाषणात राऊत यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे अखिल ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सत्तेसाठी हापपलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर आपले हिंदुत्व इतर पक्षाच्या दावणीला बांधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे. अशा शिवसेनेच्या खासदाराने आम्हा ब्राम्हणांना हिंदुत्व काय असते, हे शिकवू नये. येत्या पाच दिवसांत राऊत यांनी आपले विधान मागे घेत बिनशर्त माफी मागावी. अन्यथा ब्राम्हण समाजाच्यावतीने विनायक राऊत यांच्या नावाने अमरधाम येथे दशक्रिया विधी करण्यात येईल.

जोशी यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या स्थापनेवेळी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून जे उभे होते, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह अनेक सेनेचे नेते ब्राम्हणच होते. आजतागायत शिवसेनेच्या इतिहासात मनोहर जोशी यांच्या इतकी निष्ठा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने दाखविलेली नाही. हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे. कदाचित या गोष्टीचा राऊत यांना विसर पडलेला दिसतोय. शेंडी जानव्याचे ब्राम्हण्य माहीत नसणार्‍या राऊत यांनी पुराणाचा इतिहासाचा अभ्यास करावा. 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारे भगवान परशुराम हे ब्राम्हणांचे आद्यगुरू आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बल्लाळ भटांना पेशवे पदाची जबाबदारी दिली, ते ही ब्राम्हणच होते आणि त्यांचा इतिहास समस्त भारतवर्षाला माहिती आहे. केवळ, राजकारणातल्या द्वेषापायी जर ब्राम्हण समाजावर अशी टीका करणार असाल, तर येत्या काळात त्यांना त्यांची जागा व लायकी दाखवून देण्यात येईल, असा इशाराही जोशी यांनी दिला आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1104404

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *