जिल्ह्यात आजही आढळले उच्चांकी कोविड बाधित रुग्ण! नगर पाठोपाठ राहाता व संगमनेर तालुक्यातील कोविडचा उद्रेक आजही कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात पुन्हा जोरदार पुनरागमन करुन दररोज रुग्णसंख्येचे विक्रम घडवणार्या कोविडने रुग्णसंख्या वाढीचा आज नवा उच्चांक गाठला आहे. अहमदनगर तालुक्यातील 264 रुग्णांसह राहाता तालुक्यातील 77 आणि संगमनेर तालुक्यातील 57 रुग्णांसह जिल्ह्यात आज 660 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा डोंगर आता 83 हजार 190 संख्येवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून त्यातील संगमनेर तालुक्यात आज 57 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील 29 तर ग्रामीण भागातील 28 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 614 वर जावून पोहोचली आहे. तालुक्यात सध्या 355 रुग्ण सक्रीय आहेत.

चालू महिन्यात जिल्ह्यातील कोविडस्थिती पुन्हा ढासळली असून ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या वेगाने जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. मार्चमधील 19 दिवसांचा विचार करता अहमदनगर महापालिका आणि ग्रामीण क्षेत्र मिळून सरासरी 141 रुग्ण गतीने तेथील रुग्णसंख्येत तब्बल 2 हजार 686 रुग्णांची भर पडली आहे. त्या खालोखाल राहाता तालुक्यात सरासरी 44.42 रुग्ण या वेगाने 844, संगमनेर तालुक्यात सरासरी 42.37 रुग्ण या वेगाने 805 तर कोपरगाव तालुक्यात 27 रुग्ण दररोज या सरासरीने 514 रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात या महिन्यात आढळलेल्या एकूण 7 हजार 185 रुग्णांपैकी तब्बल 5 हजार 195 रुग्ण (72.30 टक्के) या पाच तालुक्यातून समोर आले आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्याचा रुग्णवाढीचा सरासरी दर दररोज 378 रुग्ण इतका आहे.

आजही जिल्ह्यातील उच्चांकी 660 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील 231 अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून, 349 अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून तर 80 अहवाल रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आले आहेत. आजही महापालिका क्षेत्रात 238 आणि ग्रामीण भागात 26 असे अहमदनगर तालुक्यात एकूण 264 रुग्ण आढळले. राहाता 77, संगमनेर 57, कोपरगाव 35, नेवासा व पाथर्डी प्रत्येकी 31, राहुरी 27, श्रीरामपूर 23, कर्जत 22, पारनेर 19, लष्करी क्षेत्रातून 18, अकोले 16, शेवगाव 14, जामखेड 12 व श्रीगोंदा येथील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत आज मोठी भर पडून जिल्हा आता 83 हजार 190 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आज जिल्ह्यातील 452 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आता जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 78 हजार 886 झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील 3 हजार 120 रुग्ण सक्रीय आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 184 जणांचे बळीही गेले आहेत.

गुरुवारी संगमनेर तालुक्याला काहीसा दिलासा देणार्या कोविडचा आज पुन्हा उद्रेक झाल्याचे दिसून आले. तालुक्यातील 57 जणांना कोविडची लागण झाल्याचे आज समोर आले. त्यात शहरातील तब्बल 29 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून साळीवाड्यातील 3 वर्षीय बालिका, इंदिरानगर मधील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 52 वर्षीय इसम, गणेशमळा भागातील 51 वर्षीय इसम, गणेश नगरमधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 14 वर्षीय मुलगा, मोमीनपूरा भागातील 86 वर्षीय वयोवृद्ध, बागवानपूरा भागातील 33 वर्षीय तरुण, पंपींग स्टेशनजवळील 34 वर्षीय तरुण, तांबे हॉस्पिटल परिसरातील 54 वर्षीय इसम, देवाचा मळा भागातील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 व 33 वर्षीय तरुण.

जाणता राजा मैदान परिसरातील 38 वर्षीय महिलेसह 25 वर्षीय तरुण, गोविंदनगर मधील 42 वर्षीय महिला, घोडेकर मळ्यातील 46 वर्षीय इसम, विद्यानगर परिसरातील 7 वर्षीय बालक व तीन वर्षीय बालिका, राजस्थान चित्र मंदिर परिसरातील 22 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 53 वर्षीय इसमासह 45 वर्षीय दोन व 28 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण आणि आठ वर्षीय मुलगा आणि पाच वर्षीय बालिका, सागर सोसायटीतील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह शहरातील 29 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.

ग्रामीणभागातील रुग्णवाढीची श्रृंखला आजही कायम असून तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील 28 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 41 व 37 वर्षीय तरुण आणि 46 व 19 वर्षीय महिला, चिखली येथील 44 वर्षीय इसम, निमोणमधील 58 वर्षीय इसमासह 33 वर्षीय तरुण, पळसखेडे येथील 84 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 74 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 34 वर्षीय तरुण, कौठे कमहेश्वर येथील 60 वर्षीय ज्येश्ठ नागरिक, गोल्डनसिटीतील 21 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 27 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिला, गुंजाळवाडी पठारावरील 41 वर्षीय तरुण.

समनापूर येथील 24 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 56 वर्षीय इसम, संगमनेर खुर्दमधील 47 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, चणेगाव येथील 27 वर्षीय महिलेसह 11 वर्षीय मुलगा, नान्नज दुमाला येथील 53 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 65 वर्षीय महिलेसह 14 व 10 वर्षीय मुले, मंगळापूर येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि मेंढवण येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 57 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 614 झाली आहे.

संगमनेर शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने ‘प्रतिबंधक क्षेत्र’ निशिचत करण्याची प्रक्रीया पुन्हा सुरु केली असून इंन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी हॉटेल करमच्या पाठीमागील परिसर, देवाचा मळा भागातील दत्त कॉलनीतील परिसर आणि पंपींग स्टेशन परिसरातील मोगरा कॉलनीचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून 31 मार्चपर्यंत जाहीर केले असून या क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत व्यवहार आणि नागरिकांचा वावर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

