‘मुळा’वरील पिंपळगाव धरण भरले; नदीत पाणी झेपावले
नायक वृत्तसेवा, कोतूळ
मुळा आणि भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुळा पाणलोटातील हरिश्चंद्रगड, अंबितमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने मुळा नदीत पाणी वाढल्याने अंबित पाठोपाठ 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही शुक्रवारी (ता.25) रात्री 9 वाजता ओव्हरफ्लो झाले असून आता पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे.
दहा दिवसांपूर्वी मुळा पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने अंबित धरण भरले होते. त्यानंतर पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक होत होती. हे धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर असतानाच पाऊस गायब झाला. परंतु, शुक्रवारी सकाळपासूनच पाणलोटात पावसाच्या सरी जोरदार कोसळू लागल्याने 800 क्यूसेकने पाणी धरणात दाखल झाले होते. रात्री 9 वाजेच्या सुमारास हे धरण ओव्हरफ्लो झाले असून नदीत 200 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा नदी वाहती झाली असून पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास एक दोन दिवसांत मुळा धरणात हे पाणी दाखल होण्याची शक्यता आहे.