शिवरायांसह राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या नीच प्रवृत्ती ः पोटे छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याने नेवाशात प्रहारकडून निषेध

नायक वृत्तसेवा, नेवासा
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्याने शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने प्रहारने नेवासा तहसीलवर जाऊन शुक्रवारी (ता.4) जाहीर निषेध नोंदवला. शिवरायांचा आणि राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या नीच प्रवृत्ती असल्याचा घणाघात प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी केला.

यावेळी बोलताना पोटे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी एकेरी शब्द वापरत समर्थ रामदास महाराजांचे गुरू असल्याचा चुकीचा उल्लेख केला होता आणि भाजपच्या नेत्यांनी विधानभवनात गोंधळ घातल्याने राज्यपालांचे अभिभाषण राज्यपाल राष्ट्रगीत होण्यापूर्वीच निघून जाऊन राष्ट्रगीताचा अवमान केला म्हणून निषेध नोंदविण्यात आला.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक नेते शेतकरी नेते चळवळीत शिवरायांच्या विचाराने काम करतात. यामध्ये प्रहारचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू हे छत्रपतींना ऊर्जास्थान मानतात. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत आहे हे सर्व होत असताना महाराष्ट्राच्या प्रमुखपदी राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले राज्यपाल हे महाराजांविषयी चुकीचा इतिहास पसरवून महापुरुषांचा एकेरी शब्दात उल्लेख करत आहेत. त्यात आणखी भर म्हणून राज्यपालांचे समर्थन करत असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपतींचा एकेरी उल्लेख केला. मुळात शिवकालीन युगात समर्थ रामदास हे नव्हतेच हे न्यायालयात देखील सिद्ध झाल आहे. जाणूनबुजून त्यांना महाराजांचे गुरु दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्राच्या शूर इतिहासाला वारंवार बदलण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रगीताचा अवमान करणारे राज्यपाल आणि वारंवार जीभ घसरविणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी बांधवांना साले म्हणाले होते. नामदार बच्चू कडू यांनी थेट दानवे यांच्या घरी जाऊन त्यांची सालेगिरी काढली होती. आता जबाबदारीने वागलं नाही तर त्यांना छत्रपतींच्या गनिमी काव्याने उत्तर दिले जाईल, असा इशारा पोटे यांनी दिला. याप्रसंगी प्रहारचे जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड. पांडुरंग औताडे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, तालुकाध्यक्ष जालिंदर अरगडे, कार्याध्यक्ष अनिल विधाटे, तालुका उपाध्यक्ष नागनाथ आगळे, शाखाध्यक्ष पांडुरंग नवले, सोशल मीडिया उपाध्यक्ष महेश मते, सुनील शेजूळ, रामदास अरगडे, दीपक विधाटे, शरीफ शेख, भाऊसाहेब वाडेकर व प्रहार सैनिक उपस्थित होते.

Visits: 130 Today: 1 Total: 1598395

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *