राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील चिखलफेक सहन केली जाणार नाही! संगमनेरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; व्यावहारिक वादाला राजकीय रंग दिल्याचा आरोप..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागामालक आणि भाडेकरी यांच्यात दिवाणी न्यायालयात वाद सुरु असताना त्याच्या निकालापूर्वीच दोन्ही बाजूने होणार्‍या शाब्दीक कुरबुरींना हवा देवून त्यात नाहक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव ओढण्यात आल्याने संगमनेरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसच्या काही पुढार्‍यांनी आपल्या मोहर्‍यांना हाताशी धरुन राष्ट्र सेवेत निस्पृह योगदान देत धर्म जागरणात यशस्वी झालेल्या संघाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले असून व्यावहारिक व व्यक्तिगत वादाला राजकीय स्वरुप देण्याचा हा प्रकार कदापी सहन केला जाणार नसल्याचे सांगत भारतीय जनता पक्षासह संघाशी संलग्न असलेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाने शहर पोलीस ठाण्यात जावून निषेध नोंदवला. यावेळी उपस्थित असलेल्या अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन देत सखोल चौकशीसह संघाच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन आता नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले असून सहा वर्षांपासून सुरु असलेल्या व्यावहारिक वादात अचानक ‘संघा’चे नाव का गोवण्यात आले यावरुन शंका उपस्थित होवू लागल्या आहेत.


पतित पावन संघटनेचा पाया सोबत घेवून राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राजकारणात आलेल्या खंडोबागल्लीतील अविनाश थोरात यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांचा त्यावेळी पराभव करीत संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवकपदही पटकावले होते. नंतर त्यांच्यावर जिल्हाधिकार्‍यांकडून अपात्रतेची कारवाई देखील झाली होती. खंडोबागल्लीतील मूळनिवासी असलेल्या थोरात यांनी बाजूची जागा खरेदी केली असून त्यात गेल्या 70 ते 80 वर्षांपासून भाडेकरी राहतात. त्यावरुन जागामालक आणि भाडेकरी यांच्यात संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात खटलाही सुरु आहे, त्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच येथील जवळपास दीड डझन भाडेकरी आणि जागामालक यांच्यात अधुनमधून शाब्दीक हमरीतुमरी होवून त्याचे पर्यवसान थेट अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद होण्यापर्यंतही गेले आहेत.


या परिसरात राहणार्‍या भाडेकर्‍यांनी 2019 पासून आजवर अशाप्रकारच्या व्यावहारिक वादातून माजी नगरसेवक अविनाश थोरात व त्यांचे सुपूत्र ज्ञानेश्‍वर यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात अर्धाडझन अदखलपात्र गुन्हेही दाखल केले आहेत. त्यात दोघांकडून शिवीगाळ, धमक्या, धक्का-बुक्की, महिलांशी गैरवर्तन, अनाधिकाराने घरात प्रवेश, खोट्या तक्रार दाखल करुन त्रास दिला जात असल्याचे आरोपही गेले आहेत. आजही या गोष्टी कायम असून गेल्या रविवारी (ता.20) तेथील भाडेकर्‍यांनी पुन्हा एकदा एकत्र होवून शहर पोलीस ठाण्यात नव्याने वाद झाल्याच्या तक्रारीसह गेल्या सहावर्षात घडलेल्या घटनांचा संदर्भ देण्यात आला. त्यावरुन पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या खंडोबागल्लीतील काही रहिवाशांसह भाडेकर्‍यांनी अविनाश थोरात पिता-पुत्रावर सहा वर्षात अर्धाडझनहून अधिक अदखलपात्र गुन्हे दाखल केल्याचेही दिसून आले. मात्र त्यातील कोणत्याही प्रकरणात भाजप, राष्ट्रवादी अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा वापर करुन दहशतीचा उल्लेख केला गेला नव्हता.


यावेळी मात्र रविवारी दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात अविनाश थोरात यांच्या सामाजिक व राजकीय पार्श्‍वभूमीत असलेल्या पक्ष व संघटनेसह त्यांचे सुपूत्र ज्ञानेश्‍वर थोरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या पदाचा गैरवापर करुन अशा प्रकारची दहशत करीत असल्याचा आरोप करण्यात आल्याने आश्‍चर्य निर्माण झाले. अविनाश थोरात यांच्या नगरसेवकपदाचा कार्यकाळ उलटून दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांचे सुपूत्र ज्ञानेश्‍वर यांची जन्मापासूनची पार्श्‍वभूमीच संघाची आहे. गेल्या काही वर्षांपासून ते संघाचे तालुका कार्यवाह म्हणूनही कार्यरत आहेत. मात्र असे असतानाही आजवर दाखल एकाही तक्रारअर्जात पदांचा वापर करुन दहशतीचा उल्लेख नव्हता.


मात्र 2023 नंतर थेट 2025 मध्ये गेल्या रविवारी दाखल करण्यात आलेल्या तक्रारअर्जात, त्यानंतर यू-ट्यूब माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आणि सोशल माध्यमात पसरवलेल्या बातम्यांमधून थोरात पिता-पूत्राची राजकीय व सामाजिक पार्श्‍वभूमी दाखवून अनाहुतपणे त्यात राष्ट्रवादीसह भाजप हा राजकीय पक्ष आणि राजकारणापासून अलिप्त असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा उल्लेख करुन त्याचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर होत असल्याचा आरोप करण्यात आल्याने आश्‍चर्य निर्माण झालेले असतांनाच आज शहरातील विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी मोर्चाने शहर पोलीस ठाण्यात जावून या कृतीचा निषेध नोंदवला. यावेळी दोघांच्या व्यावहारिक वादात संघाचे नाव गोवण्याचा प्रकार बदनामीच्या षडयंत्राचा भाग असल्याने त्याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी पतित पावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.एस.झेड्.देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुभाष कोथमिरे, संगमनेर तालुका सहकार्यवाह विक्रांत देशमुख, विश्‍वहिंदू परिषदेचे सुरेश कालडा, भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजणे, अ‍ॅड.श्रीराम गणपुले, भाऊ जाखडी, योगराजसिंग परदेशी यांच्यासह संघ, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या भाषणांमध्ये सर्वच वक्त्यांनी धर्मजागरणाच्या कार्यात संघाच्या कार्याला येत असलेल्या यशात अडथळे निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र राबवले जात असल्याचा गंभीर आरोप करीत त्यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


गेल्याकाही वर्षांपासून जागामालक आणि भाडेकरी यांच्यात सुरु असलेल्या वादात अर्धाडझनहून अधिक अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली असताना तब्बल दोन वर्षांनंतर दाखल झालेल्या आत्ताच्या तक्रारीत मात्र राष्ट्र व धर्म कार्यात झोकून काम करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर होत असल्याचा जाणीवपूर्वक उल्लेख करुन संघाला व त्यांच्याकडून सुरु असलेल्या सेवाकार्याला बदनाम करण्याचे षडयंत्र काही काँग्रेसच्या पुढार्‍यांनी स्थानिक मोहर्‍यांना हाताशी धरुन चालवल्याचा गंभीर आरोप सर्वच वक्त्यांनी केला. संघाच्या धर्मजागृती कार्याला मोठे यश मिळाल्याने संगमनेर मतदारसंघात परिवर्तन घडले, त्यामुळे काँग्रेसच्या पुढार्‍यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपल्या चेल्यांना हाताशी धरुन संघाच्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे, मात्र हा प्रकार सूर्यावर थुंकण्यासारखा असल्याची घणाघाती टीकाही करण्यात आली.

Visits: 297 Today: 2 Total: 1115028

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *