अमरधामच्या सुशोभिकरणाचे भूत पालिका पदाधिकार्‍यांच्या मानगुटावर! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आक्रमक; पोलिसांना सोपविला तक्रार अर्ज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिकेच्या नगराध्यक्षांसह काही नगरसेवक, मुख्याधिकारी व बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी अपहाराच्या हेतूने दोन वर्षांपूर्वीच झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढल्या. त्यासाठी अधिकार्‍यांच्या खोट्या टिपन्या तयार करण्यात आल्या, खोटे ठरावही घेण्यात आले व निधी मिळवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला खोटे हमीपत्रही देण्यात आल्याचा घणाघाती आरोप करीत संगमनेरच्या भाजपाने या सर्वांवर आर्थिक गुन्हा केल्याप्रकरणी तक्रार केली आहे. याबाबत अद्याप शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र भाजपाने घेतलेल्या या पवित्र्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना कारवाईसाठी पत्रही दिले आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले यांनी पोलीस अधीक्षकांसह संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना तक्रार अर्ज सोपविला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संगमनेर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने शहरातील अमरधामच्या कामासाठी 24 लाख 88 हजार 442 रुपये व आमदार निधीतील फंडासाठी 9 लाख 16 हजार 66 रुपये अशा एकूण 34 लाख 4 हजार 508 रुपयांच्या दोन निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र या दोन्ही निविदांमध्ये प्रस्तावित असलेली कामे त्यापूर्वीच काढण्यात आलेल्या 63 लाख 19 हजार 733 रुपयांच्या निविदेद्वारा 5 डिसेंबर, 2019 रोजीच्या कार्यारंभ आदेशान्वये 25 डिसेंबर, 2020 रोजी पूर्ण होवून त्याची संपूर्ण रक्कमही संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आली होती.

सदरची बाब लक्षात आल्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपेश ताटकर यांनी 15 डिसेंबर, 2021 रोजी संगमनेर नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना सदरची निविदा प्रक्रीया रद्द करण्याची व शासनाची फसवणूक थांबविण्याची विनंती करणारे निवेदन दिले. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ताटकर यांनी 3 डिसेंबररोजी त्यांना स्मरणपत्रही पाठवले. याच पत्रातून त्यांनी कारवाई न झाल्यास 28 डिसेंबरपासून उपोषणाचाही इशारा दिला होता. मात्र त्यावरही कोणतीच कारवाई न झाल्याने भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 28 डिसेंबरपासून पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर उपोषणाला सुरुवात केली. यावर कारवाई म्हणून मुख्याधिकार्‍यांनी दोन दिवसांत सदरची कामे पूर्वी झालेली आहेत किंवा कसे याबाबत पंचनामा करण्याचे आश्वासन देत आंदोलन थांबविण्यास सांगितले.

मात्र त्या उपरांतही त्यांनी कोणतीच हालचाल न केल्याने अखेर भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांच्या उपस्थितीत अमरधाम येथे जावून 5 डिसेंबर 2019 रोजीच्या कार्यारंभ आदेशानुसार पूर्ण करण्यात आलेल्या कामांचा पंचनामा केला, यावेळी निविदेत नमूद असलेली सर्व कामे पूर्ण झाल्याचेही या शिष्टमंडळाच्या लक्षात आले. मात्र तरीही पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्याच दरम्यान 6 जानेवारी, 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले संगमनेरच्या पंचायत समिती येथे आले असता भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन दिले व कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी त्याच ठिकाणी हजर असलेल्या संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांना चौकशी करण्याचे तोंडी आदेश दिल्याचेही या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.गणपुले व सरचिटणीस जावेदअली समशेरअली सय्यद यांनी मुख्याधिकार्‍यांना अर्ज देवून संबंधित प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार या दोहींनी 20 जानेवारी व 9 फेब्रुवारी 2022 रोजी पालिकेच्या कार्यालयात जावून या प्रकरणाच्या फाईलींची तपासणीही केली व आवश्यक असलेल्या नकलाही मिळविल्या. त्यानुसार 5 डिसेंबर, 2019 रोजी दिलेल्या 63 लाख 19 हजार रुपयांच्या कामाच्या कार्यारंभ आदेशात पूर्ण झालेल्या कामांचे बिल सादर करताना त्याची छायाचित्र देणे बंधनकारक असल्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार ठेकेदाराने बिलासोबत छायाचित्र दाखल केलेली आहेत. त्या छायाचित्रात दिसत असलेले आणि भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी 31 डिसेंबर, 2022 रोजी केलेल्या जनता पंचनाम्यानुसार 7 डिसेंबर, 2021 रोजी बोलावलेल्या 24 लाख 88 हजार व 9 लाख 16 हजार रुपये किंमतीच्या निविदांमध्ये प्रस्तावित केलेल्या एकूण बारापैकी 11 कामे त्यापूर्वीच पूर्ण झालेली होती. त्याच्या पूर्णत्त्वाचा दाखला बिलासोबत 18 मार्च, 2020 व 23 ऑक्टोबर, 2020 रोजी संबंधित ठेकेदार आर.डी.थोरात यांनी छायाचित्रासह दाखल केला असून त्यांना मार्च 2020, 10 नोव्हेंबर 2020 व 13 जुलै, 2021 रोजी त्याचे बिलही अदा करण्यात आल्याचे समोर आले.

रुपये 24 लाख 88 हजार रुपयांच्या निविदेतील कामांसाठी नगरपरिषदेने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या आमदार निधीतून रक्कम मागितली होती. तशी शिफारस 24 एप्रिल, 2021 रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. त्या शिफारशीसह संबंधित कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झाल्यानंतर 10 मे, 2021 रोजीच्या पत्राद्वारे जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर करताना अन्य शासकीय तरतुदींमधून सदर कामासाठी खर्च झालेला नाही वा प्रस्तावित काम यापूर्वी केलेले नाही असे हमीपत्रही मागवले होते. तसे हमीपत्र दिनांक 30 सप्टेंबर, 2021 रोजी मुख्याधिकार्‍यांच्या सहीने देण्यातही आले. मार्च 2020, नोव्हेंबर 2020 व जुलै 2021 मध्ये आधीच्या कामाची दोन चालू बिले व अंतिम देयक मंजूर करतेवेळी मुख्याधिकारी, शहर अभियंता व स्थापत्य अभियंता यांनी देयकावर सह्या केल्या आहेत.

त्याचप्रमाणे त्यासोबत दाखल करण्यात आलेल्या छायाचित्रांवरही त्यांनी सह्या केलेल्या आहेत. असे असतानाही नवीन प्रस्ताव तयार करुन आमदार निधीतून रक्कम मिळविण्यासाठी पूर्वी काम केलेले नाही व अन्य निधीचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी वापरणार नाही असे हमीपत्र दिनांक 30 सप्टेंबर, 2021 रोजी मुख्याधिकार्‍यांनी दिले. पहिली रक्कम रुपये 63 लाख 19 हजारची निविदा आर.डी.थोरात यांनी भरली व त्यांना कार्यारंभ आदेश मिळाला. सदर कामाची दोन चालू देयके व अंतिम देयक छायाचित्रासह तपासणी करुन स्थापत्य अभियंता पंकज मुंगसे यांनी अदा केले आहे.

दिनांक 6 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या कौंसिल सर्वसाधारण सभेचा ठराव क्र.100 नुसार नगराध्यक्षा दुर्गा तांबे व सदस्य यांनी अमरधाम येथील विविध विकासकामे सूचविली. त्यावर नगर अभियंता, मुख्याधिकारी व लेखापरिक्षकांची टिपणीही वाचून दाखवण्यात आली असा ठराव करण्यात आला. त्यावर नगरसेवक किशोर हिरालाल पवार हे सूचक तर विश्वास रतन मुर्तडक हे अनुमोदक आहेत. हा विषय ठरावास पाठविण्यापूर्वी सूचवणारे सदस्य व अध्यक्ष, स्थापत्य अभियंता, शहर अभियंता, मुख्याधिकारी या सर्वांना सदरची कामे 2018 ते 2020 मध्ये पूर्ण झालेली असल्याची माहिती होती व या कामांचे बिल अदा करताना दिलेल्या छायाचित्रातून ते स्पष्टही होते.

त्याचप्रमाणे दिनांक 5 जुलै, 2021 रोजीच्या कौंसिल ठराव क्र.54 प्रमाणे 9 लाख 16 हजार रुपयांचे काम करण्याचा ठराव करतेवेळी नगर अभियंता यांची टिपणी वाचून दाखविली असून त्यावर सूचक दिलीप सहदेव पुंड व अनुमोदक नितीन बाजीराव अभंग हे आहेत. 2018 मधील निविदेतील कामे पूर्ण झाल्याच्या छायाचित्रात या सर्वांची छायाचित्रे असल्याने काम पूर्ण असल्याबाबत या सर्वांना माहिती होती. वरीलप्रमाणे संपूर्ण वस्तुस्थिती माहिती असतानाही नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, स्थापत्य अभियंता पंकज मुंगसे, नगरसेवक किशोर हिरालाल पवार, विश्वास रतन मुर्तडक, नितीन बाजीराव अभंग, दिलीप सहदेव पुंड यांनी संगनमताने, एकविचाराने व आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने 2019-20 सालीच अमरधामचे पूर्ण झालेल्या कामांसाठी नव्याने निविदा काढून सभागृहाची दिशाभूल केली.

एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात वरील सर्वांनी संगनमताने कारस्थान रचून पूर्वी झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा मागविल्या, त्यातून अपहार करणेसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे 6 नोव्हेंबर, 2020 व 5 जुलै, 2021 रोजी खोट्या टिपण्या वाचून दाखविल्या, त्या आधारावर फसवणुकीने ठराव मंजूर करुन घेतले, जिल्हा नियोजन समितीला खोटे हमीपत्र सादर केले व निधी मिळविला. ही सर्व कामे अपहाराच्या हेतूने लोकसेवक असतांना व आपण करीत असलेले कृत्य बेकायदेशीर असल्याचे माहिती असतानाही नगरपरिषदेचा विश्वासघात केला व त्यातून रकमेचा अपहार करण्यासाठी खोटी कागदपत्रे बनविली असा गंभीर आरोप करीत अ‍ॅड.गणपुले यांनी या सर्वांनी आर्थिक गुन्हा केला असल्याचे सांगत त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे, त्यांनी तसा अर्जही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.


आगामी काळात पालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या हाती मोठे घबाड लागले असून याच मुद्द्याचा वापर येत्या पालिका निवडणुकीत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक भाजपाने हा मुद्दा उचलून पकडला असून सर्व कागदपत्रे मिळवित फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावून खासगी फिर्याद दाखल करण्याची तयारीही विरोधकांनी केल्याने अमरधामच्या विकासाचे भूत सध्यातरी सत्ताधारी गटाच्या मानगुटावर बसल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *