अण्णा हजारेंच्या माजी स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल टँकरने पाणी पुरवठा करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, नगर
भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या विरोधात सतत आवाज उठविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माजी स्वीय सहाय्यकाच्या कंपनीचाच एक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. टँकरने पाणी पुरवठा करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून पारनेर तालुक्यातील साई सहारा इन्फ्राण्ड फॅसिलिटी प्रा. लि. या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कंपनी हजारे यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक व सध्याचे कार्यकर्ते उद्योजक सुरेश पठारे व त्यांच्या सहकार्‍यांची आहे. त्यामुळे आता हा गैरव्यवहार उघडकीस आणणारे रामदास घावटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत थेट हजारे यांची भेट घेतली. या कंपनीशी संबंधित काही संचालक राळेगणसिद्धी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी घावटे यांनी केली आहे. यावर आता हजारे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 2019 मध्ये दुष्काळामुळे पाणी टंचाई होती. त्यामुळे प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा केला. या कालावधीत पाणी पुरवठा करणार्‍या टँकरच्या खेपा बोगस दाखवून मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्याची चौकशी झाली. तथ्य आढळून आल्याने कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरुन पारनेर पोलीस ठाण्यात आता पारनेर तालुक्यात पुरवठा करणार्‍या साई सहारा इन्फ्राण्ड फॅसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही कंपनी राळेगणसिद्धी येथील सुरेश पठारे, निघोज येथील मळगंगा डेअरी उद्योग समूहाचे मच्छिंद्र लंके, अभय औटी, दादाभाऊ पठारे, नितीन अडसूळ, विठ्ठल गाजरे, विठ्ठल पवार यांच्या मालकीची आहे. पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई विभाग यांनी पारनेर येथील साई सहारा या कंपनीला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे गेली पाच वर्षे कंत्राट दिले होते. या कंपनीने पाणी पुरवठा करताना अनेक शासन नियमांचा भंग करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पारनेर तालुक्यातील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी यासंबंधी तक्रार दिली होती. या तक्रारीचा त्यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून तशी माहिती घावटे यांना कळविण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करावी. त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे, अशी मागणी आता घावटे यांनी केली आहे. त्यानंतर घावटे यांनी हजारे यांचीही भेट घेतली. त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. यामध्ये गुन्हे दाखल झालेल्यांपैकी काही व्यक्ती राळेगणसिद्धी येथील विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत, त्यांचा राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणीही घावटे यांनी हजारे यांच्याकडे केली आहे. पाणी पुरवठा करणार्‍या टँकरने खेपा कमी करुन जास्त दाखवल्या. वाहतुकीच्या अंतरातही घोळ केला. अन्य त्रुटीही राहिल्या आहेत. अशा पद्धतीने हा गैरव्यवहार टँकर घोटाळा केल्याचा आरोप लोकजागृती शोध प्रतिष्ठानने तक्रारीत केला आहे. त्यानुसार सरकाराने त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेने ही कारवाई केली आहे.

Visits: 96 Today: 1 Total: 1109311

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *