पुणतांबा येथे पुन्हा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटली! सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, राहाता
शेतकरी संपाचे केंद्रबिंदू ठरलेल्या पुणतांबा (ता.राहाता) गावातून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटली आहे. शेतात ऊस उभा आहे, कांद्याला भाव नाही, द्राक्षे टरबूज फेकून देण्याची वेळ आली आहे तर वीज संकटाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशी सर्व संकटे असूनही सरकार दखल घेत नसल्याने पुन्हा एकदा शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

पुणतांबा येथे बुधवारी (ता.1) बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. बळीराजाच्या पूजनानंतर गावातून कृषी दिंडी काढून धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली. शेतकर्‍यांचे हे धरणे आंदोलन 5 दिवस सुरू राहणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. 5 जूनपर्यंत राज्य सरकारने आपल्या समस्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधीक तीव्र करण्यात येईल अशी शेतकर्‍यांनी भूमिका घेतली आहे.

या आंदोलनकर्ते शेतकर्‍यांनी ऊसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे, शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे, कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा, कांद्याला प्रतीक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, शेतकर्‍यांना दिवसा पूर्णदाबाने वीज मिळावी, थकीत वीजबिल माफ करावे, कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी, सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा, 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, नियमित कर्ज भरणारांचे अनुदान द्यावे, दुधाला ऊसाप्रमाणे एफआरपी लागू करावी, दुधाला कमीत कमी चाळीस रुपये दर द्यावा, खासगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी, वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई द्यावी, शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घ्यावे, वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर कराव्यात आदी मागण्या केल्या आहेत.

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये याच पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या आंदोलनानंतर राज्यभर शेतकरी आंदोलन सुरू झाले होते. ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झालेल्या पुणतांब्यात पुन्हा एकदा शेतकर्‍यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आपल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात पाच दिवस हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.

Visits: 162 Today: 3 Total: 1101332

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *