… अखेर अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव! नायजेरियातून श्रीरामपूरमध्ये आलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कोरोनाच्या दुसर्या लाटेत काळजीचे कारण बनलेल्या आणि अद्यापही कोरोनातून पुरेसा दिलासा न मिळालेल्या अहमदनगर जिल्ह्यात आता ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. गेल्या आठवड्यात नायजेरियातून श्रीरामपूरला आलेल्या 41 वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात 41 वर्षीय आई आणि सहा वर्षांचा मुलगा नायजेरियातून श्रीरामपूरला परतले होते. त्यांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची चाचणी केली. तेव्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या स्त्राव नमुने ओमिक्रॉनसंबंधीच्या चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी (ता.24) प्राप्त झाला. त्यानुसार यातील महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या महिलेसह तिच्या लहान मुलाचीही प्रकृती ठीक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ज्या टॅक्सीमधून ते आले होते, त्या चालकासह त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांची तपासणी करण्यात आली होती. या सर्वांचे कोरोना चाचणीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मात्र महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर आता संपर्कातील सर्वांवरच देखरेख ठेवली जाणार आहे.
![]()
जिल्ह्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगरला आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. आता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वरीष्ठ अधिकार्यांना तालुकानिहाय जबाबदार्या दिल्या आहेत. त्यानुसार तालुक्यात आढावा बैठका घेऊन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत अहमदनगर जिल्ह्याने राज्याची डोकेदुखी वाढविली होती. दुसरी लाट ओसरत असतानाही कोरोना पूर्णत: नियंत्रणात आलेला नाही. दररोज 40 ते 70 नवे रुग्ण आढळून येत आहेत. पॉझिटिव्हिटी रेट कमी होताना दिसत नाही. याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही जिल्हा तुलनेत मागे आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आता सर्वच पातळ्यांवर उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.
