वयोमानानुसार सत्तेचा मोह सोडून बाजूला व्हावे ः पवार अकोलेत शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारार्थ सभा

नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति सहकार साखर कारखान्याची निवडणूक सध्या गाजत आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.15) प्रचारसभेला येऊन यात आणखी रंग भरला. सहकारी संस्थांमध्ये जुन्या-नव्या लोकांचा समावेश हवा, असे सांगताना काही लोकांनी वयोमानानुसार सत्तेचा मोह सोडून बाजूला होत नव्यांना संधी दिली पाहिजे, असे म्हणत माजी मंत्री मधुकर पिचड यांना टोला लगावला. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उदाहरण दिले. पवार यांनी वयोमानानुसार विविध संस्थांमध्ये नव्या लोकांना संधी देत मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीत पिचड यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी मिळवून शेतकरी समृद्धी मंडळ उभे केले आहे. त्याच्या प्रचारासाठी पवार अकोल्यात आले होते. यावेळी सहकारी संस्थांच्या कारभारावर भाष्य केले. चांगले व्यवस्थापन असेल तर संस्था चांगल्या चालतात. आमच्या पुणे जिल्ह्यात येऊन पाहा. इतर निवडणुकांपेक्षा सहकारी संस्थांच्या निवडणुका जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण त्या संस्थांच्या कारभाराचा थेट प्रत्येक सभासदाच्या घरावर परिणाम होत असतो. अगस्ति कारखाना गेल्या कित्येक वर्षांपासून ठराविक लोकांच्या ताब्यात आहेत. कर्जबाजारी होऊन तो मागे पडला आहे. विधानसभा निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे आम्ही त्यात लक्ष घालत आहोत. या कारखान्याची स्थिती सुधारायची असेल तर आमच्या विचारांची माणसे येथे निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

नव्या सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले, सध्याच्या सरकारमध्ये आताच माईकची खेचाखेची सुरू आहे. हे सरकार किती काळ टिकणार आहे, हे सांगता येणार नाही. त्यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तारही होत नाही. वास्तविक पाहता सध्या अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे. अशा काळात पूर्ण मंत्रिमंडळ हवे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री हवेत. त्यांच्यामार्फत दिलासा देण्याचे काम झाले पाहिजे. अडचणीच्या काळात मदत करणार नसेल तर त्या सरकारकडून जनतेने काय अपेक्षा करायची?, असेही पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी अजित पवार यांनी सीताराम गायकर यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्याची तालुक्यात चर्चा आहे. त्याच मुद्द्यावरून काही शेतकर्‍यांनी त्यांचा ताफाही अडविला होता. यावरही अजित पवार सभेत बोलले. त्यावेळी मी ते वक्तव्य केले होते. त्याला संदर्भ तसा होता. माझी कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे सांगून त्या वक्तव्याचा विषय सोडून देऊन पुढे वाटचाल करण्याचा संदेशच जणू पवार यांनी दिला. या सभेस आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर, अशोक भांगरे, मधुकर नवले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, भानुदास तिकांडे, डॉ. अजित नवले, शांताराम वाळुंज, अमित भांगरे, विजय वाकचौरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक उपस्थित होते.

Visits: 135 Today: 1 Total: 1597073

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *