स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सामूहिक शक्तीचा आविष्कार व्हावा ः डॉ. मालपाणी संगमनेर महाविद्यालयातील क्रीडांगणार 75 किलोमीटर तिरंगी दौड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येक भारतीयाने उत्साहात साजरा करावा. सामूहिक शक्तीचा आविष्कार यातून झाला पाहिजे. शासनाने निर्धारित केलेल्या ध्वजसंहितेचे पालन करणेही गरजेचे आहे. आपला तिरंगा ध्वज म्हणजे बलिदानाचे प्रतीक आहे म्हणून स्वातंत्र्याच्या यशोगाथेची माहिती युवकांना झाली पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.

संगमनेर महाविद्यालयातील क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, लायन्स क्लब संगमनेरचे अध्यक्ष उमेश कासट, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, प्रा. अप्पासाहेब गुंजाळ, क्रीडा संचालक डॉ. अजितकुमार कदम, प्रा. डॉ. प्रताप फलफले, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक गपले, डॉ. राजेंद्र वामन, प्रा. डॉ. अशोक तांबे व महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. मालपाणी म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे झाल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या अभियानाची घोषणा केली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही विशेष अभिनंदनीय बाब आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण तरुण पिढीला झाले पाहिजे. म्हणून महाविद्यालयीन पातळीपासून हर घर तिरंगा लढा महान माझा तिरंगा माझी शान असा उपक्रम विद्यापीठासोबत संगमनेर महाविद्यालयाने हाती घेतली आहे. त्यामुळे 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक भारतीयाने अभिमानाने तिरंगा ध्वजासोबत फोटो काढून, तिरंगा आपल्या घरावर फडकावून संपूर्ण देशात एक नवीन उत्साह संचार करावा. स्वातंत्र्याविषयी प्रेमभावना प्रत्येकाच्या मनात झाली पाहिजे. तिरंगा झेंड्याला मानवंदना देत असताना, देशाला आपण काहीतरी देणे लागतो ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून केंद्र, राज्य शासन आणि विद्यापीठाने नेमून दिलेली कामगिरी करण्यासाठी आपण सारे सज्ज होऊया असे ते शेवटी म्हणाले.

सदर कार्यक्रमाच्या वेळी लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरतर्फे आजादी का अमृत महोत्सव या आशयाचे टी-शर्टचे मोफत वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रताप फलफले मानले. सदर कार्यक्रमासाठी संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ, कमवा शिका योजनेचे समन्वयक, कार्यक्रम अधिकारी व समन्वयकांनी तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन बहुसंख्येने सहभाग नोंदविला. तसेच महाविद्यालयाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर 75 किलोमीटर तिरंगी दौड एकाच वेळी पाच विद्यार्थ्यांनी 400 मीटर अंतर पूर्ण केल्यानंतर पुढील पाच विद्यार्थ्यांकडे राष्ट्रध्वज सुपूर्द केला, अशा रीतीने 75 किलोमीटर दौड पूर्ण झाली.

Visits: 93 Today: 1 Total: 1101941

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *