धार्मिक विधीसाठी कोपरगावातील भटजींनी घातली ‘ही’ अट! लसीकरण प्रमाणपत्र पाहूनच काम स्वीकारणार; समाजमाध्यमांत संदेश व्हायरल..

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढावे म्हणून प्रशासनाकडून विविध युक्त्या आणि आता सक्तीही केली जाऊ लागली आहे. लस नाही तर पेट्रोल नाही, लस नाही तर पगार नाही असेही प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. याशिवाय इतर अनेक कारणांसाठी लसीकरण आता आवश्यक मानले जाऊ लागले आहे. कोपरगावमध्ये मात्र पूजा सांगणार्या भटजींनीही अशीच अट घातली आहे. ज्या घरात धार्मिक विधी करायचा असेल, तेथे लोकांनी लसीकरण केलेले पाहिजे, असा नियम त्यांनी केला आहे. लसीकरण प्रमाणपत्र पाहूनच ते काम स्वीकारत आहेत. यासंबंधीचा त्यांचा संदेश समाजमाध्यमांत व्हायरल झाला असून त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.

कैवल्य गुरुजी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पूजापाठ करतात. कोरोनाच्या काळात पूजा सांगणार्या अनेकांना जीव गमावण्याची वेळ आलेली आहे. तर काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरल्याची उदाहरणे आहेत. सरकारने नियम केले असले तरी अनेक जण ते धाब्यावर बसवून कार्यक्रम घेतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी कैवल्य गुरुजींनी स्वत:पासून सुरुवात केली आहे. आपल्यासाठी त्यांना नियमावली तयार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्यांच्या घरातील सर्व व्यक्तींचा कोरोना लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस झाले आहेत, फक्त त्यांच्याच घरी धार्मिक विधीचे कार्यक्रम केले जातील. कोणत्याही पूजेपूर्वी घरातील लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य राहील. विवाह करण्यापूर्वी वधू व वरांचे तसेच दोघांच्या आई वडिलांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाईल, त्याशिवाय विवाहकार्य केले जाणार नाही, याची सर्व यजमानांनी नोंद घ्यावी. मला माझी व तुमची काळजी आहे म्हणून आजच लसीकरण करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याचा अनुभव घेतलेल्या सचिन कोळपे यांनी सांगितले की, लसीकरण वाढविण्यासोबतच सर्वांच्या सुरक्षितेतसंबंधी हा चांगला निर्णय आहे. कैवल्य गुरुजींनी या कारणासाठी अनेकांना पूजेसाठी नकारही दिला आहे. मात्र, अशी स्वत: होऊन बंधने घालून घेतली तर सरकारी नियमांची अंमलबजावणीही सोपी होऊ शकेल.
