कट्टर राजकीय विरोधक पिचड-भांगरे आले एकत्र! आदिवासींच्या प्रश्नांवर एकत्र लढा देण्याचा निर्णय
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट दिसून आली. आमदार डॉ. किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्यातील धुसफूस यानिमित्ताने चव्हाट्यावर आली. त्यामुळे सामाजिक कामाच्या नावाखाली अशोक भांगरे व भाजपचे नेते वैभव पिचड एकत्र आल्याचे शुक्रवारी (ता.24) पाहायला मिळाले.
एरव्ही तीव्र राजकीय मतभेद असलेले भाजपचे माजी आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नांवर एकत्र आले आहेत. दोन्ही नेते घोरपडा देवी मंदिरात झालेल्या खासगी कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर आले होते. त्यांनी कार्यक्रमापूर्वी एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी केली. कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मंदिरात एकत्र चर्चा केली. याप्रसंगी भांगरे व पिचड यांनी आदिवासींच्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे ठरविले असून लवकरच सामाजिक प्रश्नावर राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर मेळाव्याचे आयोजन करून आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगितले.
सामाजिक प्रश्नांबाबत आमचे एकमत असून राजकीय पक्षाचे काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. समाजाच्या हितासाठी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला आहे. आजही या वयात ते काम करत आहेत. ज्येष्ठ नेते भांगरे आमच्या मताशी सहमत आहेत याचा आनंदच आहे.
– वैभव पिचड (माजी आमदार)
आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या देव, धर्म, पारंपारिक चालीरीती जोपासत आला आहे. वर्षानुवर्षे तो महादेवाला मानतो. तसेच प्रत्येक आदिवासी गावात मारुती, श्री विठ्ठल मंदिर आहे. या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह बसविला जाऊन त्यातून आध्यात्मिक संस्कार जोपासला जातो. त्या परंपरेला कुणी छेद देत असेल तर मान्य होणार नाही. माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्नांची सोडवणूक करू.
– अशोक भांगरे (ज्येष्ठ नेते- राष्ट्रवादी)