साई संस्थानकडून मुदत संपलेल्या गावरान तुपाची विक्री करण्याचा घाट! सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी पाठविले विधी व न्याय सचिवांना पत्र

नायक वृत्तसेवा, शिर्डी
मुदत संपलेल्या शुद्ध गावरान तुपाचा जाहीर लिलाव करून साईबाबा संस्थान विक्री करण्याचा घाट घालत आहे. मात्र हे कायद्याविरोधात असून या मुदत संपलेल्या तुपामुळे दुसर्‍याच्या जीविताला धोका होऊ शकतो. अशाप्रकारे वापराची अंतिम मुदत संपलेल्या तुपाची विक्री करणे हा गुन्हा आहे आणि हा प्रकार संस्थानच्या लक्षात का आला नाही? असा सवाल करत या तुपामुळे सुमारे 75 लाख रुपयांचा फटका संस्थानच्या तिजोरीला बसला आहे. नुकसान भरपाई म्हणून सर्व पैसे संस्थानच्या संबंधित अधिकार्‍यांच्या पगारातून वसूल करावे. याचबरोबर तुपाची जाहीर निविदा काढल्यामुळे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरही कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी विधी व न्याय मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे पत्रातून केली आहे.

याबाबत संजय काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयातून भक्तांना लाडूचा प्रसाद दिला जातो. त्यासाठी शुद्ध गावरान तूप वापरले जाते. मात्र येथे वापरण्यात येणारे गावरान तुपाच्या वापराची अंतिम मुदत संपलेली असताना ते मूळ खरेदी केलेल्या ते कंपनीला परत देणे गरजेचे होते. मात्र संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर मात्र मुदत संपलेल्या शुद्ध गावरान तुपाचा जाहीर लिलाव करून संस्थान विक्री करण्याचा घाट घालत आहे.

मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार साईबाब मंदिर बंद झाले. यादरम्यान प्रसादालय व लाडूप्रसाद बंद होते. डिसेंबर 2020 मध्ये शासनाने मंदिर मंदिर उघडण्यास परवानगी दिली व पुन्हा 16 एप्रिलला मंदिर व प्रसादालय बंद झाले. संस्थानने यापूर्वी मे, हर्ष फ्रेश डेअरी भगवानपूर, हरिद्वार यांच्याकडून मदर डेअरी प्रॉडक्ट कंपनीचे गायीचे शुद्ध गावरान तूप खरेदी केले. सदर तुपाची अंतिम वापराची मुदत 4 ऑक्टोबर, 2021 होती. असे असताना सुमारे 1454 डबे म्हणजेच 218.10 क्विंटल हे तूप संस्थानकडे शिल्लक होते. या गावरान तुपाची वापराची अंतिम मुदत संपल्यानंतर देखील सुमारे 75 लाख रुपये िंकंमतीच्या व मुदत संपलेल्या 218.10 क्विंटल तुप विक्री करण्याकामी संस्थानने ई-निविदा अथवा जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. मुदत संपलेले खाद्यपदार्थ विक्री करण्याचा घाट संस्थान प्रशासनाने घातला. हा अन्न आणि औषध प्रशासनाच्या कायद्यांतर्गत गुन्हा असून एखाद्याने जर मुदत संपलेले गावरान तूप खरेदी केले व ते इतर तुपात मिसळून त्याची सर्वसामान्य जनतेला विक्री केली; आणि त्यांच्या जीविताला धोका झाला तर याला जबाबदार कोण? संस्थान प्रशासनाने अंतिम मुदत संपण्यापूर्वीच ते मूळ मालकाला परत देणे गरजेचे होते. मात्र तसे अधिकार्‍यांनी केले नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 115707

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *