विक्रम गोखलेंनाही पद्मश्री मिळवावा वाटतोय ः थोरात तळेगाव दिघे येथे शेतकरी विजय दिवस साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘बेताल वक्तव्य करणार्या कंगनाला 40 बॉडीगार्डची सुरक्षा आणि पद्मश्री हा पुरस्कार मिळतो, हे बघून विक्रम गोखले पुढे आले. त्यांनाही पद्मश्री व्हायचंय वाटतं,’ असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतल्याने संगमनेर तालुक्यातील ताळेगाव येथे रविवारी (ता.21) शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

अभिनेत्री कंगना राणावत हिने भारतीय स्वातंत्र्यलढ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि देशभर मोठा गदारोळ झाला. भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं, असं म्हणत कंगनाने अकलेचे तारे तोडले. कंगनाच्या या वक्तव्यावर चहुबाजूने टीका होत असताना ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी मात्र कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केलं. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ठराविक लोकांसाठी केंद्राकडून कायदे तयार करण्याचं काम सुरू आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असताना टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले? कंगणा राणावत काय बोलते? स्वातंत्र्याबद्दल बोलण्याचा तिला अधिकार आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर टीका केली. वादग्रस्त बोलणार्यांचं बोलणं सहज नसतं, कोणीतरी यामागे आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्व संत विचारांचा सार डॉ. बाबासाहेबांनी केला अन् राज्यघटना तयार केली. हे आज स्वातंत्र्यावर बोलत आहेत, उद्या राज्यघटनेवरही बोलतील. मात्र देश राज्यघटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, प्रभाकर कांदळकर, गणपत सांगळे, साहेबराव गडाख, सुभाष सांगळे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, रामदास वाघ, बाबा ओहोळ, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, सचिन दिघे, अनिल कांदळकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र गोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे व संपत दिघे यांनी करुन आभार मानले.
