जबरी चोरीतील दोघांच्या आवळल्या मुसक्या पोलीस उपाधीक्षक राहुल मदनेंच्या पथकाची दमदार कामगिरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांचा कारवाईचा सिलसिला सुरूच आहे. सोमवारी मोबाइल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर पुन्हा जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत.

संगमनेर उपविभागात चोरीचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लोणी-कोकणगाव रस्त्यावर अजय अर्जुन जोंधळे (वय 24, कोकणगाव) याच्या खिशातून पाणी वाटपाची 9 हजार रुपयांची रक्कम तिघा अज्ञातांनी लुटल्याच्या तपासाकामी उपाधीक्षक मदने यांनी पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांना आदेश दिले. या पथकाने गुन्ह्या घडल्याचे व आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फूटेज तपासले. तसेच तांत्रिक तपास करुन हा गुन्हा घडलेला नसून फिर्यादीनेच कोकणगाव ग्रामपंचायतीच्या मालकीची रोख रक्कम हडप करण्यासाठी बनाव केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केला असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदरचा बनाव करण्याकरीता त्याचा साथीदार विजय राजेंद्र पारधी (वय 22, रा. शिवापूर, कोकणगाव) याने मदत केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेत चौकशी केला असता त्यानेही कुबली दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी बनाव केलेल्या रकमेपैकी 780 रुपये रोख हस्तगत केले असून बाकी रक्कम इतर ठिकाणी खर्च केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. वरील दोघा आरोपींना पुढील कारवाईसाठी संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहे.

Visits: 182 Today: 1 Total: 1916683

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *