अभिनव प्रयोगांद्वारे तब्बल अकरा शेती शेती सेंद्रीय पद्धतीने फुलविली! गणोरे येथील प्रयोगशील शेतकरी संजय वाकचौरेंचे तंत्रज्ञान ठरतेय आदर्श

नायक वृत्तसेवा, अकोले
शाश्वत शेतीसाठी जगभर अनेक प्रयोग शेतकरी करत असतात. दिवसेंदिवस शेती खर्चिक आणि तोट्यात जात असल्याचे अनेक शेतकरी सांगत असतात. आपल्याकडे केली जाणारी शेती निसर्गाच्या स्वाधीन असते. शेतीतून येणारे उत्पन्न हे शाश्वत व अपेक्षेप्रमाणे येईलच असेही नसते. शेतामध्ये अनेक समस्यांना तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आलेला आपण बघतो. त्यातच बदलते हवामान आणि जागतिक तापमान वाढीचा शेती आणि संबंधित व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे आपण बघतोच. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे या सर्वांचा फटका शेतीलाही मोठ्या प्रमाणावर बसतो. तरीही शेतकरी न डगमगता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. अशाच एका प्रयोगशील आणि अभ्यासू शेतकर्‍याची भेट घेण्याचा योग आला. अकोले तालुक्यातील गणोरे गावचे रहिवासी असलेले संजय वाकचौरे व त्यांचे वडील देविदास वाकचौरे यांनी अकरा एकर शेती संपूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने फुलविलेली आहे. त्यांनी शेतात अभिनव प्रयोग राबवून देशभर गाजत लौकिक मिळविला आहे. अतिशय साध्या पद्धतीने छोट्या – छोट्या शेतकर्‍यांना उपयोगी पडेल असे तंत्रज्ञान त्यांनी विकसित करून शेतीला नवीन चालना दिली आहे.

एकीकडे शेती उत्पादन खर्च अमाप होत असताना शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे कमीत कमी खर्चामध्ये शेती करण्याचा आदर्श संजय वाकचौरे यांनी उभा केला आहे. आपल्याच शेतावर नैसर्गिकपणे उगलेल्या मुबलक प्रमाणातील गुळवेल आणि धोत्रा या वनस्पतींचा त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वापर केला आहे. त्यापासून कीटकनाशके व बुरशीनाशके तयार केलेली आहेत. त्यांचा संतुलित वापर करून त्यांनी रोग आणि कीड यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या शेतीचे हे खास गमक ठरलेले आहे. याचबरोबर पशुधनापासून मिळणार्‍या मलमूत्राचा वापर करुन त्यांनी गोबरगॅस तयार केलेला आहे. या गॅसचा उपयोग घरातील स्वयंपाक करण्यासाठी होतो, तर त्यातून बाहेर येणारी स्लरी उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत म्हणून उपयोगात आणतात. तसेच त्यापासून गांडूळ खत व गांडूळ पाणी उच्च दर्जाचे व प्रतीचे बनवण्याचे तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केले आहे. कंपोस्ट खत व गांडूळ खत यांचा असंतुलित वापर शेतीसाठी नियमितपणे केला जातो. रिसायकलिंग पद्धतीने केले जाणारे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि छोट्या शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक आहे.

शेतावर मोनोकल्चर डेव्हलप न करता मिश्र पद्धतीची शेती विकसित केली आहे. त्यामुळे विविध पिकांच्या लागवडीतून त्यांनी शेतीचे बरोबर संतुलन साधले आहे. अ‍ॅपल बोरची सुमारे 18 गुंठे क्षेत्रावर लागवड केलेली आहे. त्यापासून गेली तीन वर्षे ते शाश्वत उत्पन्न घेत आहेत. सुमारे 20 ते 25 टन फळांची दरवर्षी ते विक्री करतात. सरासरी त्यांना प्रतिकिलो 20 ते 25 रुपये भाव स्थानिक बाजारपेठेत मिळत आहे. चवीला अत्यंत गोड व आकाराने मोठे असलेले फळे सर्वांचे आकर्षण ठरलेले आहे. बागेमध्ये झाडांवर पाने कमी आणि फळे जास्त असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. याशिवाय त्यांनी शाश्वत शेतीचे संतुलन राखण्यासाठी शेतावर विविध फळपिके व नगदी पिके लागवड केलेली आहेत. लिंबोणी – 750 झाडे, सफरचंद 251 कलम, डाळिंब 1500 कलम, ऊस 4 एकर, कांदे, कोथिंबीर, मेथी, पालक, चारा पिके मका, नेपियर, बाजरी, घास ही पिकेही लावलेली आहेत. याशिवाय गहू, हरभरा या पिकांचीही सेंद्रीय पद्धतीने ते लागवड करतात.

दरम्यान, संजय वाकचौरे यांच्या अभिनव शेतीला भेट देण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी मोठ्या संख्येने येत असतात. त्यांनी राबवलेले सेंद्रीय शेतीचे प्रयोग प्रत्येक शेतकर्‍याच्या दारात घेऊन जाण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे. छोट्या होतकरू शेतकर्‍यांना जे प्रयोगशील आणि शेतीला वेगळी दिशा देऊ शकतात अशा व्यक्तींची निवड करून त्यांना विविध विकास यंत्रणांकडून आर्थिक व तांत्रिक सहकार्य मोठ्या प्रमाणावर दिले गेले पाहिजे. त्यातून शेती उद्योजक आणि प्रयोगशील शेतकरी निर्माण होतील असा विश्वास वाटतो. स्वतःचे भांडवल गुंतवून उभी केलेली प्रयोगशाळा व त्यातून शाश्वत शेतीचे साकारलेले स्वप्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संजय वाकचौरे त्यांच्या सुविद्य पत्नी भारती, आई सिंधूबाई, वडील देविदास वाकचौरे या सर्वांचीच मेहनत शेतामध्ये दिसून येते. या सर्वांचा वाटा सेंद्रीय आणि शाश्वत शेती फुलवण्यात आहे. शेती सुद्धा व्यवसाय आहे आणि तो तितक्याच कल्पकतेने केला पाहिजे हे त्यांच्या शेतावर गेल्यावर पटल्याशिवाय राहत नाही.

Visits: 100 Today: 2 Total: 1109410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *