अजबच! स्वॅब न देणार्या व्यक्तीला कोरोना तपासणी अहवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्याकडून भांडाफोड

नायक वृत्तसेवा, नेवासा
कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी स्वॅब न दिलेल्या एका नागरिकाला तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो निगेटिव्ह आलेला असला तरी स्वॅब न देताच अहवाल कसा आला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनासह सरकारला धारेवर धरले आहे. प्रशासनाकडून आलेल्या नमुना आणि माहितीच्या आधारे आम्ही अहवाल देतो, असे संबंधित प्रयोगशाळेने कळविले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आणला आहे. जिल्हा प्रशासनासह सरकारलाही त्यांनी धारेवर धरले आहे. ‘माझ्या एका मित्राने कोरोना चाचणी केली नाही. तरी रिपोर्ट आला, आता काय करायचे? कृपया आपण यावर मार्गदर्शन करावे. कारण ‘डब्ल्यूएचओ’ सुद्धा आपल्या सल्ल्याने काम करते, असे ऐकले होते,’ असे वर्मा यांनी राज्य सरकारला उद्देशून उपरोधिक ट्वीट केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे आकडे पुन्हा वाढू लागले आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाच्या अँटीजेन आणि आरटीपीसीआर दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. कधी नागरिक स्वत: होऊन तपासणीसाठी जातात तर कधी प्रशासन आणि हॉस्पिटलमध्ये विविध कारणावरून तपासणी केली जाते. मात्र, वर्मा यांच्या मित्राने यापैकी कोणत्याही प्रकारे तपासणी केलेली नाही. त्यांचा स्वॅबही कोणी घेतलेला नाही. तरीही त्यांना नवी मुंबईस्थित एका लॅबच्या लेटरहेडवर कोरोना चाचणी घेतल्याचा आणि ती निगेटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

यावर वर्मा यांनी संबंधित लॅबशी संपर्क साधला. असा अहवाल कसा येऊ शकतो, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर लॅबमधील प्रतिनिधीने त्यांना सांगितले की, आमच्याकडे प्रशासनाकडून तपासणीसाठी नमुने आणि तपशील येतो. त्यानुसार आम्ही तपासणी करून देत असतो. या प्रकरणात कदाचित मोबाइल नंबर चुकीने टाकला गेल्याने दुसर्याचा अहवाल आला असू शकतो, असे लॅबमधून सांगण्यात आले. मात्र, वर्मा यांनी प्रश्न केला की मोबाइल नंबर टाकण्यास गफलत झाली हे मान्य केले तर त्या व्यक्तीचे नाव, इतर तपशील, पत्ता हे कसे काय बरोबर आले? नाव तर दुसर्याचे यायला हवे होते? या प्रश्नावर लॅब प्रतिनिधी निरुत्तर झाला. त्यामुळे यामध्ये मोठी गडबड आणि संशय घेण्यास वाव असल्याचे वर्मा यांनी सांगितले. सध्या कोरोनासंबंधी जी आकडेवारी दिली जात आहे, ती अशा तपासण्यांमधून येत असेल तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्नही वर्मा यांनी केला आहे.
