दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरची बाजारपेठ सजली! ठोक विक्रेत्यांची दिवाळी सुरु; किरकोळ विक्रेत्यांना मात्र ग्राहकांची प्रतीक्षा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिंदु धर्मियांमध्ये अनन्य महत्त्व असलेला दिवाळीचा सण अवघ्या दहा दिवसांवर येवून ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांची लगबग दिसत असून बाजारपेठाही सजल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र बाजारपेठेत अद्यापही दिवाळीच्या खरेदीचा माहोल तयार झालेला नाही. अर्थात साखर कारखाना, दूध संघ व खासगी उद्योगांकडून अद्याप बोनस जमा झालेले नसल्याने सामान्य ग्राहक बाजारपेठांपासून दूर असल्याचा निष्कर्ष काही व्यापार्‍यांकडून मांडण्यात आला आहे. वर्षभरानंतर नागरिकांना सण-उत्सव साजरा करण्याची संधी मिळाल्याने यंदा दिवाळीत मोठी उलाढाल होईल असा अंदाजही शहरातील काही ठोक विके्रत्यांनी व्यक्त केला आहे. आजच्या स्थितीत किराणा व भुसार मालासह ठोक कापड बाजारात ग्राहकांची रेलचेल असली तरीही किरकोळ बाजारपेठेला मात्र अजूनही काही दिवस ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पुणे-नाशिक महानगरांदरम्यान वसलेल्या संगमनेरची बाजारपेठ अहमदनगर जिल्ह्यात समृद्ध समजली जाते. किराणा-भुसार, तेल-तुप, कापड, सुवर्ण अलंकार, फर्निचर यासह गृहसजावटीसाठी लागणार्‍या विविध वस्तूंच्या दालनांनी शहराच्या समृद्धीत मोठी भर घातली आहे. येथील सहकारातून तालुक्यातील प्रवरापट्टा अधिक विकसित झाला असून पारंपरिक दुष्काळीभागासाठी निळवंडेतून पाटपाण्याचे नियोजन सुरु असल्याने येणार्‍या कालावधीत जिल्ह्यातील सर्वाधीक संपन्न तालुक्यांच्या पंक्तित संगमनेरचे स्थान अग्रणी असणार आहे. सहकार व उद्योगाच्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळाल्याने तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या जीवनालाही आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. त्याचाच परिणाम येथील विविध बाजारपेठा जिल्हा मुख्यालयालाही मागे टाकतील इतक्या उलाढालीच्या बनल्या आहेत.

किराणा-भुसार, कापड व तेला-तुपाचे ठोक व्यापारी संगमनेरात असल्याने येथील बाजारपेठातून केवळ तालुक्यातच नव्हेतर आसपासच्या तालुक्यांसह शेजारच्या जिल्ह्यातही मालाचा पुरवठा होतो. दिवाळीच्या पंधरवड्यात संगमनेरच्या बाजारपेठेत 400 ते 500 कोटी रुपयांची उलाढाल होते. यावरुनच संगमनेरच्या बाजरपेठेचे महत्त्व अधोरेखीत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशभरात थैमान घालणार्‍या कोविडने सामान्य माणसांचे आर्थिक गणितंच कोलमडून टाकले आहे. त्याचा परिणाम गेल्यावर्षीच्या दिवाळीने अनुभवला असला तरीही यावर्षी मात्र नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करतील असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या ठोक बाजारात सध्या खरेदीदारांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

या वर्षी राज्यातील देवस्थाने उघडण्यात आली असून सणांनाही फारसे निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सामान्य नागरिकांची आर्थिक चणचणही दूर झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात शेतकर्‍यांची संख्याही मोठी आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर तालुका दूध संघ, मालपाणी उद्योग समूह, एस.आर.थोरात उद्योग समूह या मोठ्या उद्योगांसह बहुतेक लहान-मोठे कारखानदार, उद्योजक व व्यापार्‍यांकडून दिवाळीच्या काही दिवस अगोदर बोनस अथवा रिबेटचे पैसे दिले जात असल्याने पगारदार वर्गासह शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांच्या हाती अजूनही पैसा आलेला नाही. दिवाळी खरेदीच्या बाबतीत यापूर्वीची गणितं बघितल्यास दिवाळीच्या चार दिवसांतच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत असते. त्यामुळे किरकोळ व्यापारी वर्गाला अजून काही दिवस ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

किराणा व भुसार मालाच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत तालुक्यात खेडोपाडी आणि महत्त्वाच्या अनेक रस्त्यावर प्रशस्त सुपर शॉपी उभ्या राहील्याने त्याचा फटका प्रत्यक्ष शहरातील किराणा दुकानांना बसण्याची शक्यता वर्मविली जात असली तरीही दिवाळीचा सण विचारात घेता ग्रामीणभागातील ग्राहकांचा खरेदीसाठीचा कल शहरातूनच असल्याने यंदाच्या दिवाळीत अशा सुपर शॉपीचा शहरातील किराणा दुकानांना किती मोठा फटका बसतो याचा अंदाज बांधता येईल असे या क्षेत्रातील जाणकारांनी दैनिक नायकशी बोलतांना सांगितले.

संगमनेरची बाजारपेठ खुप समृद्ध आणि मोठी आहे. गेल्या काही वर्षात संगमनेरात सर्व प्रकारचे उद्योग आणि व्यवसायांची मोठी भरभराट झाली आहे. त्या अनुषंगाने येणारा दिवाळी सण निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या कालावधीनंतर नागरिकांना सण-उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत अपेक्षेपेक्षा अधिक उलाढाल होईल असा अंदाज आहे. मात्र बोनस, फरक आणि रिबेटच्या माध्यमातून फिरणारा पैसा अजून बाजारात आलेला नसल्याने सध्या केवळ ठोक बाजारात गर्दी आहे. पुढील आठवड्यात हे चित्र बदलेल असा विश्वास आहे.
– श्रीगोपाल पडताणी
किराणा व भुसार मालाचे ठोक व्यापारी

Visits: 104 Today: 1 Total: 1424315

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *