पिंपरी निर्मळ येथील वाड्या-वस्त्या चार दिवसांपासून अंधारात महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. वीज वाहिन्यांवरील बिघाड न सापडल्याने गेल्या 4 दिवसांपासून गावठाण वगळता गावातील सर्व वाड्या वस्त्या अंधारात आहेत. महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सोपान निर्मळ यांनी केली आहे.
पिंपरी निर्मळ गावाला बाभळेश्वर उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. गावठाण भागासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर असल्याने येथील वीज पुरवठा सहसा खंडित होत नाही. मात्र गावठाण व्यतिरिक्त वाड्या-वस्त्यांना आठ तास शेतीसाठी व उरलेल्या कालावधीत सिंगल फेजने वीज पुरवठा होतो. पिंपरी निर्मळ येथील बहुसंख्य ग्रामस्थ वाड्या-वस्त्यांवरच राहतात. गेल्या चार-पाच दिवसांपासून मेन लाईनवरील बिघाडामुळे येथील शेती व सिंगल फेजचा रात्रीचा वीज पुरवठा खडित आहे.
त्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच रात्र काढण्याची वेळ येत आहे. पिके वाढलेली असल्याने परिसरात बिबट्यांची मोठी दहशत आहे. त्यातच वीज पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महावितरण कंपनीने तातडीने बिघाड दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सोपान निर्मळ यांनी केली आहे.
चार महिन्यांपासून रोहित्र बंद..
पिंपरी निर्मळ येथील बाह्यवळण रस्त्यावरील म्हसोबा मळा परिसराला वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र चार महिन्यांपासून जळाले आहे. परिसरातील शेती व घरगुती वीज पुरवठा बंद आहे. महावितरणने या रोहित्राच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या रोहित्राची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.