सत्ता बदलली मात्र संगमनेरातील गायींच्या रक्ताचे पाट थांबेनात! घारगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; अलिशान वाहनातील गोमांस पकडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या राज्यात विद्यमान असलेल्या महायुती सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्यासह देशी गायींना राज्यमातेचा दर्जा दिला. मात्र यासर्व गोष्टी केवळ कागदांवरच असल्याचे संगमनेरमधून वारंवार समोर येत आहे. मंगळवारी रात्रीही तालुक्याच्या पठारभागातून असाच प्रकार समोर आला असून संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांमधून गोमांस घेवून निघालेले अलिशान वाहन घारगाव पोलिसांनी पकडले. खंदरमाळ ते आंबीफाटा असा सिनेस्टाईल पाठलाग करीत पकडलेल्या या वाहनात पाठीमागील आसन काढून त्याजागी भरलेले तब्बल साडेसहाशे किलो वजनाचे गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी संगमनेरातील दोघा कसायांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी चार लाखाच्या वाहनासह 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईने संगमनेरात सत्ता बदल होवूनही येथील कसायांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत असून शहरात गायींच्या रक्ताचे पाट आजही वाहतेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई मंगळवारी (ता.31) रात्रीच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितील आंबीफाटा परिसरात करण्यात आली. मंगळवारी सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दित चोख बंदोबस्तासह जागोजागी नाकाबंदी केली गेली होती. त्या अनुषंगाने घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी खंदरमाळ व आंबी फाटा येथे नाकाबंदीसह महामार्गावर गस्तीपथक तैनात केले होते. त्यांच्याकडून संशयीत वाहनांची तपासणी सुरु असतानाच रात्री आठच्या सुमारास संगमनेरच्या बाजूने पुण्याकडे निघालेल्या पांढर्या रंगाच्या अलिशान मारुती स्वीफ्ट कारमधून (क्र.एम.एच.14/बी.सी.5022) गोवंश जनावरांचे कापलेले मांस वाहुन नेले जात असल्याची माहिती खंदरमाळजवळ नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी रस्त्यातील अडथळे वाढवून माहिती मिळालेल्या वाहनाची प्रतिक्षा सुरु केली असता काही वेळातच संगमनेरच्या दिशेने आलेले संशयीत वाहन पोलिसांच्या इशार्याकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने निघून गेले. त्यामुळे पोलिसांनीही तत्काळ आपल्याकडील सरकारी वाहनातून त्याचा पाठलाग सुरु केला. शिवाय पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे आंबी फाट्यावरील नाकाबंदीवर स्वतः हजर असल्याने त्यांनी संशयीत वाहन टप्प्यात येताच पुण्याच्या दिशेने जाणारी संपूर्ण वाहतूक रोखली. त्यामुळे पाठीमागून आलेल्या स्वीफ्ट चालकाला आपले वाहन उभे करण्याशिवाय पर्यायच राहीला नाही. सदरील वाहन थांबताच त्याच्या पाठीमागून आलेल्या पोलीस वाहनातील कर्मचार्यांनी लागलीच धाव घेत ‘त्या’ वाहनातील दोघांच्या मुसक्या आवळल्या.

यावेळी खंदरमाळजवळ थांबण्याचा इशारा देवूनही गाडी का थांबवली नाही? असा सवाल केला असता पोलिसांना पाहुन घाबरल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील बाजुची आसन व्यवस्था काढून रिकाम्या केलेल्या जागेत मोठ्या प्लॅस्टिक कागदाचा वापर करुन गोमांस भरल्याचे आढळले. त्यावरुन पोलिसांनी वाहनातील दोघांनाही ताब्यात घेत पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले व आरोपींसह ताब्यात घेतलेले वाहन पोलीस ठाण्यात जामा केले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी आरोपी जावेद इसहाक शेख (वय 26, रा. संगमनेर खुर्द) व मोहम्मद उमर बेपारी (वय 23, रा.अकोले नाका) या दोघांवर भारतीय न्यायसंहितेसह महाराष्ट्र प्राणीसंरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, बाबुराव गोडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, रोहिदास आंधळे यांचा सहभाग होता. या कारवाईने राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्यासह गायींना राज्यमातेचा दर्जा देणार्या पक्षाचे सलग तिसर्यांदा सरकार स्थापन होवूनही संगमनेरातील गायींच्या रक्ताचे पाट मात्र आजही वाहतेच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यासह गायींना राज्यमातेच्या दर्जा देणार्या महायुतीने सलग तिसर्यांदा ऐतिहासिक बहुमत मिळवून राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र या सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात संगमनेरातील कत्तलखाने मात्र कधीही बंद होवू शकले नाहीत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघही महायुतीच्या ताब्यात गेला. त्यामुळे आतातरी गोमातेच्या उघड चालणार्या अमानुष हत्या थांबतील असे वाटत असतानाच घारगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईने या सर्व गोष्टी फोल ठरवल्या असून सत्ता कोणाचीही असो संगमनेरचे कत्तलखाने कधीही बंद होवू शकत नाहीत असा संदेशच दिला आहे.

