‘बहिणीला पळवलं, आता हिलाही पळवू..’ घुलेवाडीत अल्पवयीन मुलीची छेड; नराधमाच्या पालकांवरही ‘पोक्सो’ दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या बहिणीसोबत चाललेल्या अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्‍लील कृत्य करत ‘हिच्या बहिणीला पळवून नेले, आता हिलाही पळवायचे आहे’ अशी उघड धमकी देणार्‍या एका विकृताला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेलेल्या पीडितेच्या पालकांसमोर त्याच्या आई-वडिलांनी उलट त्याच्या दूष्कृत्याचे समर्थन करीत ‘नुसतं सांगायचं कशाला?, पळवूनच न्यायची. आम्ही भक्कम आहोत!’ असे म्हणतं जणू कायद्यालाच आव्हान दिले. या प्रकाराने संतप्त झालेल्या पीडितेच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल करीत मुख्य आरोपी आकाश प्रताप मुर्तडक याला अटक केली. या प्रकाराने प्रचंड विस्तारलेल्या घुलेवाडी हद्दित संताप निर्माण झाला असून आरोपी मुलाच्या दूष्कृत्याला पाठबळ देणार्‍या पालकांवरही कायद्याचा धाक निर्माण करण्याची मागणी होत आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता.16) सायंकाळी सहाच्या सुमारास घुलेवाडी हद्दितील एका वसाहतीत घडला. यातील पीडित 13 वर्षीय मुलगी आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत खासगी शिकवणीसाठी जात असताना रस्त्यात एका ठिकाणी आरोपी आकाश प्रताप मुर्तडक त्याच्या मित्रांसमवेत उभा होता. पीडित मुलगी त्यांच्या जवळून जात असताना आरोपीने बोटाने इशारा करीत त्यांना उद्देशून ‘हिच्या बहिणीला पळवलं, आता हिलाही पळवू’ असे म्हणत अतिशय अश्‍लिल कृत्य केले.


या प्रकाराने भयभीत झालेल्या दोन्ही मुली शिकवणीला न जाताच घरी परतल्या आणि मुसमुसत घडला प्रकार आईला सांगितला. या प्रकाराने संतप्त झालेल्या पीडितेच्या पालकांनी घुलेवाडीतच दुसर्‍या वसाहतीत राहणार्‍या आरोपीच्या घरी जावून त्याच्या पालकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही सुसंस्कृत पालकांकडून अशा कृत्याची गांभीर्याने दखल घेवून किमान समज देण्याची अपेक्षा असताना या घटनेत मात्र आरोपी मुलाला पाठबळ देत त्याच्या बापाने उलट ‘नुसतं सांगायचं कशाला?, पळवूनच न्यायची. आम्ही भक्कम आहोत!’ असे म्हणतं एकप्रकारे जणू कायद्यालाच आव्हान दिले.


या सगळ्या प्रकारात आरोपीची आई मागे कशी राहणार?. तिनेही आपल्या मुलाच्या गैरकृत्याचे समर्थन करीत पीडित मुलीच्या आईला उद्देशून ‘तुमची मुली सांभाळायची लायकी नाही, या गावात आमचं कोणी वाकडं करीत नाही, तुम्हाला कोठे तक्रार करायची ती करा..’ असे आवेशाने ओरडून सांगत थेट तिच्या अंगावरच धाव घेतली. हा सगळा प्रकार सुरु असताना आसपासचे रहिवाशीही जमा झाले होते, दोघांच्या भांडणातून एकंदरीत घडलेला प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्यातही आरोपी आणि त्याचे नागडे समर्थन करणार्‍या त्याच्या पालकांविषयी संताप निर्माण झाला.


या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी आकाश प्रताप मुर्तडक, त्याचा बाप प्रताप दिगंबर मुर्तडक आणि आई विजया प्रताप मुर्तडक अशा तिघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 79, 351 (2), 352, 3 (5) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करुन मुख्य आरोपी आकाश मुर्तडक याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने संपूर्ण घुलेवाडी परिसरात प्रचंड संताप निर्माण झाला असून अशा प्रकारचे उघड दूष्कृत्य करणार्‍या आरोपीसह त्याचे समर्थन करणार्‍या पालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


एकीकडे महिलांच्या सशक्तिकरणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनेक योजना राबवल्या जात असल्या तरीही प्रत्यक्षात मात्र आजही रस्त्यावर चालणार्‍या मुली पूर्णतः सुरक्षित नाहीत असे चित्र दाखवणार्‍या या घटनेत कायद्याचे उल्लंघन करणार्‍या आपल्या मुलाचे उघड समर्थन करण्याचा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. या घटनेतून आजचे पालक आपल्या पाल्यांवर कोणत्या प्रकारचे संस्कार करीत आहेत असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. भररस्त्यात उघडपणे अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची धमकी आणि त्यानंतर पालकांकडून ‘सांगायचं कशाला, पळवूनच न्यायचं’ म्हणतं नागडं समर्थन अतिशय धक्कादायक असून पोलिसांनीही केवळ मुख्य आरोपीवर कायद्याची जरब बसवण्याशिवाय त्याच्या पालकांनाही त्याची जाणीव निर्माण करुन देण्याची गरज आहे.

Visits: 78 Today: 1 Total: 1413626

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *