मसालाकिंग दातारांकडून कोरोना रुग्णांसाठी रिक्षा रुग्णवाहिका

नायक वृत्तसेवा, नगर
दुबईस्थित अल अदील समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ.धनंजय दातार यांच्या सहकार्यातून ऑक्सिजनची तीव्र गरज भासणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित स्वदेश सेवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम या दोन स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही खास सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नुकतेच पुण्यात झाले आहे.

या उपक्रमांतर्गत ऑक्सिजन सिलिंडर व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज 25 रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्सचा ताफा तत्पर असून त्यांची संख्या लवकरच 100 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट्य आहे. प्रारंभी या रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स पुणे शहर व लगतचे मुळशी, मावळ आदी तालुके, पिंपरी-चिंचवड, भोर, सांगली व अहमदनगर या शहरांत सेवा देतील. अनेकदा रुग्णाचे घर गल्लीबोळात असल्याने रुग्णवाहिका तेथपर्यंत पोहोचणे अशक्य होते. यावर ऑटोरिक्षाचा वापर अ‍ॅम्ब्युलन्स म्हणून करण्याची कल्पना सूचली. या उपक्रमाला समाजहितैषी डॉ.धनंजय दातार यांनी संपूर्ण अर्थसाह्य दिले असून बघतोय रिक्षावाला फोरमने 25 रिक्षांचा ताफा व समर्पित चालकांचा संघ दिला असल्याची माहिती उपक्रमाच्या समन्वयक तथा स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापिका धनश्री पाटील यांनी दिली आहे. तरी गरजूंनी 96572 89411 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बघतोय रिक्षावाला फोरमचे संस्थापक डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले आहे.

Visits: 102 Today: 2 Total: 1104248

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *