बीजमाता राहिबाई पोपेरेंनी साकारला बियाणांचा ‘बाप्पा’! दररोज कुटुंबीय करताहेत मनोभावे पूजा; शेतकरी सुखी करण्याचीही बाप्पाला प्रार्थना
नायक वृत्तसेवा, अकोले
पारंपारिक बियाणे संवर्धनातून अकोले तालुक्याला देशात आणि विदेशात ओळख निर्माण करून देणार्या बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहेत. मनोभावे दररोज त्यांची पूजा केली जाते.
बियाणे हेच आपले आयुष्य मानून शेतकरी वर्गासाठी दिवसरात्र कष्ट घेणार्या बीजमाता म्हणून नावलौकिक असलेल्या राहिबाई व त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी अतिशय कष्टाने आणि कल्पकतेने हे गणपती बाप्पा साकारले आहेत. बाप्पांची प्रतिकृती तयार करताना निसर्गातील विविध रंगछटा आणि आकार असलेल्या बियांचा अतिशय सुबकतेने त्यांनी वापर केलेला आहे. तृणधान्य गळीतधान्य तेलबिया भाजीपाल्याची विविध बियाणे यांचा त्यांनी वापर केलेला आहे. या कामात त्यांचे नातवंड, मुले आणि सूना यांनी त्यांना मनापासून मदत केलेली आहे. दररोज या बाप्पांची मनोभावे संपूर्ण कुटुंबाकडून पूजा केली जाते.
विशेष म्हणजे या बाप्पांची जागा सुद्धा बियाणे बँकेतच निवडण्यात आलेले आहे. देश आणि विदेशात मिळालेले पुरस्कार व सन्मानचिन्ह यांचा कल्पकतेने वापर करून सुंदर आरास बाप्पा भोवती तयार करण्यात आलेली आहे. बीजमाता यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येत अनेक अडचणींवर मात करून पारंपारिक बियाणे जतन करून ठेवलेली आहेत. त्यांच्या या कार्याला बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेकडून तेवढीच तोलामोलाची साथ भेटल्याने हजारो शेतकर्यांपर्यंत गावरान बियांचा ठेवा पोहोचवता आल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक गावात गावरान बियाणांची बँक तयार होऊ दे, शेतकरी राजाला समाधानाचे दिवस येऊ देत, पाऊस पाणी चांगला होऊ दे, हेच मागणे त्यांनी बाप्पाकडे मनोभावे केले आहे.