ऑगस्ट महिन्यात राजूरमध्ये न्यायालय होणार सुरू पदाधिकार्यांसह ग्रामस्थांच्या लढ्याला आले यश

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील चाळीस गाव डांगाणची राजधानी म्हणून ओळख असलेल्या राजूर येथे न्यायालय व्हावे, या मागणीसाठी राजूरकरांच्या आणि परिसरातील आदिवासी बांधवांच्या गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात हे न्यायालय सुरू होणार आहे.

अनेक वर्षांपासून राजूर येथे न्यायालय व्हावे ही मागणी पुढे आली होती. तेव्हापासून माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे तसेच माजी सरपंच हेमलता पिचड, माजी सरपंच गणपत देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, विद्यमान सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर येलमामे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. आत्तापर्यंत न्यायालयाच्या नियोजित इमारतीची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. न्यायालयासाठी लागणारे फर्निचरही आलेले आहे. तसेच न्यायाधीशांसाठी निवासस्थानही निश्चित केले आहे. परंतु न्यायालय येण्यासाठी तारीख पे तारीख मिळत होती. त्यामुळे राजूरप्रमाणे परिसरातील आदिवासी बांधवांची प्रतीक्षा कायम होती.

मागील महिन्यापासून या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती आली. अकोले वकील संघटना व राजूर ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी तातडीने पावले उचलली. गुरुवारी नगर येथे उपसरपंच संतोष बनसोडे, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, अॅड. दत्तात्रय निगळे, अॅड. तेजस पवार, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे, इतर ग्रामस्थ व अकोले येथील काही वकिलांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांची भेट घेतली. उच्च न्यायालयाचे गार्डियन न्यायाधीश यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्या सोयीनुसार ऑगस्ट महिन्यात तारीख निश्चित होणार आहे. सदर कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, याबद्दल त्यांनी नियमावली सांगून त्याचप्रमाणे कार्यक्रम करावा, अशी सूचना केली आहे. आता 15 ऑगस्टपूर्वी राजूर येथे न्यायालय सुरू होणार हे आता निश्चित झाले.
